रत्नागिरीत मिशन हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी शंभरहून अधिक सायकलस्वार रॅलीमध्ये सहभागी झाले आणि भर पावसातही सायकलपट्टूंचा उत्साह अधिक असल्याचे दिसून आले. शहरातील मुख्य मार्गावरून जाणाऱ्या या रॅलीने घरोघरी तिरंगा लावण्याचा संदेश देण्यात आला. दोन दिवसापासून सतत कोसळणारा धो धो पाऊस, त्यातून तिरंगा जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले. त्यामुळे पावसामुळे सुरुवातीला सायकलस्वार सहभागी होतील की नाही, अशी चिंता वाटत असतानाच लहानापासून मोठ्यांपर्यंत अनेक उत्साही सायकलस्वार सहभागी झाले.
मिशन हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृती मोहिमेसाठी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. पाटील व सौ. पाटील यांनी आकाशात फुगे सोडले आणि रॅलीला प्रारंभ झाला. याप्रसंगी जनजागृती संघाचे अध्यक्ष केशव भट, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई, कॅ. कोमल सिंग, सुधीर रिसबूड, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे प्रसाद देवस्थळी, दर्शन जाधव, महेश सावंत, योगेश मोरे, निलेश शाह, विनायक पावसकर, श्रद्धा रहाटे, डॉ. सनगर आदींसमवेत लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रविण जैन, सचिव विशाल ढोकळे, गणेश धुरी, ओंकार फडके, पराग पानवलकर, दिप्ती फडके, दत्तप्रसाद कुलकर्णी, राजीव लिमये, प्रमोद खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. रॅली दरम्यान सुरस स्नॅक्सने पाण्याची व्यवस्था आणि सांगते प्रसंगी लायन्स क्लबतर्फे स्नॅक्सची व्यवस्था केली.
सायकल रॅलीचा मार्ग जयस्तंभ येथून एसटी स्टॅन्ड, राम आळी, गोखले नाका, लक्ष्मीचौक, पतितपावन मंदिर, जोशी पाळंद, टिळक आळी, कॉंग्रेस भवन, आठवडा बाजारमार्गे पुन्हा जयस्तंभ येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचली. त्यामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संपर्क युनिक फाउंडेशनचे कार्यकर्तेसुद्धा सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
रॅलीमध्ये प्रत्येक सायकलला तिरंगा फडकावण्यात आला होता. त्यामुळे सायकल रॅली तिरंगामय झाली होती. रॅली विविध प्रमुख ठिकाणांवरून जाताना नागरिकांनीही प्रोत्साहन दिले. छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वा. सावरकर, लोकमान्य टिळक यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.