वातावरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या उलथापालथी मुळे अनेक बदल घडून येत आहेत. कधी मुसळधार पाउस तर कधी कडकडीत उन्ह त्यामुळे या प्रतिकूल बदलामुळे शहरासह ग्रामीण भागामध्ये तापसरीसह सर्दी खोकला अशा अन्य साथींचा फैलाव होत आहे. तापसरीच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. तापसरीच्या जोडीने डेंगी साथीचाही फैलाव होत असल्याचे बोलले जात आहे.
साथीचे आजार वेगाने फैलावत असल्याने लोकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागातर्फे शहरामध्ये तातडीने सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले असून संशयितांचे रक्त नमुने संकलित करून ते तपासणीसाठी पाठविण्याची कार्यवाही सुरू झाल्याचे डॉ. कामले यांनी यावेळी स्पष्ट केले. शहरासह ग्रामीण भागामध्येही साथींचा अटकाव करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दिवसागणिक साथीच्या फैलाव होण्यामध्ये वाढ होत चालली आहे. शहरातील तापसरीसारख्या साथीचा वाढता फैलाव आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिकेने शहरामध्ये औषध आणि धूर फवारणी करण्याला सुरवात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून साथीच्या फैलावाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करताना आजारसदृश लोकांचे रक्त नमुने घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कामले यांनी दिली.
दरम्यान, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. यादव यांनी तालुक्याला गुरुवारी दि. २२ ला भेट दिली. या भेटीवेळी त्यांनी आरोग्य विभागाशी संवाद साधताना साथींचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, यासाठी तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती डॉ. कामले यांनी दिली.

