रत्नागिरीच्या सृष्टीसौंदर्याची मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीला देखील भुरळ पडलेली आहे. मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील काही ठिकाणी वेबसिरीजचे शुटींग सुरु आहे. त्यामध्ये दिव्यांग मुलांची तस्करी, ग्रामीण आणि शहर भागातील लोकांचा दिव्यांगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि कुचकामी प्रशासन यावर ही सिरीज भाष्य करत एक गुढ आणि शहारे आणणारा अनुभव चित्रित केला आहे. यातील कलाकार स्थानिक-तंत्रज्ञ स्थानिक असून त्यांचे चित्रीकरण तालुक्यातील चवे-ओलपाटवाडी, आगरनरळ या भागात करण्यात आले आहे. वेब सिरीजचे संकलन, डबिंग, म्युझिक रत्नागिरीतच केले गेले आहे. दिव्यांग-२ या सिरीजचे दिग्दर्शन प्रदीप शिवगण यांचे असून निर्मिती डॉ. नितीन चव्हाण तर छायाचित्रण सचिन सावंत यांचे आहे.
रत्नागिरीत फिल्म क्षेत्रात पाऊल टाकलेल्या के. झेड. क्रिएटिव्ह संस्थेची दिव्यांग-२ ही वेबसिरीजचे गणेश चतुर्थीच्या मुहर्तावर ‘के. झेड.रंगपट’ या युट्यूब चॅनलवर तसेच एम. एक्स प्लेयर, हंगामा या ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित झाली रसिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. के. झेड, क्रिएटिव्ह ही संस्था रत्नागिरीत स्थानिक कलाकार, तंत्रज्ञांना घेऊन चित्रपट, वेबसिरीज, लघुपट यांची निर्मिती करत असून सध्या त्यांच्या ‘कोकणातल्या झाकन्या’ या वेबसिरीजला महाराष्ट्रातून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
त्यांचेच पुढेचे भक्कम पाऊल म्हणजे के. झेड, निर्मित सस्पेन्स-थ्रिलर दिव्यांग-२ वेब सिरीज असून या सिरीजमध्ये प्रेक्षकांना दिव्यांग-१ च्या पुढची गोष्ट पहायला मिळणार आहे. सलग सात ते आठ महिने वेबसिरीजचे काम सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस, जाकादेवी बाजारपेठ व्यावसायिक, जाकादेवी सरपंच, आगरनरळ सरपंच आणि ग्रामस्थ, चवे सरपंच, ओलपाटवाडी ग्रामस्थ, देवजी गवाणकर, बापू गवाणकर, प्रशांत महाकाळ, अमोल देसाई, सिद्धीविनायक नगर फेज-१ सोसायटी आणि दिव्यांग-२ चे निर्माते आणि के. झेड चे विश्वस्त डॉ. नितीन चव्हाण यांचे सहकार्य लाभल्याची माहिती शिवगण यानी दिली.