भविष्यात रत्नागिरी हा भाजपाचा बालेकिल्ला असेल तसेच हिंदुत्वाचाही बालेकिल्ला असे, असा विश्वास राज्याचे मत्स्योद्योग व बंदरविकास मंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्ष आयोजित महाआरती कार्यक्रमात ते बोलत होते. रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत बॉडी बिल्डींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या निमित्ताने ना. नितेश राणे रत्नागिरीत आले होते. यावेळी स्वा. लक्ष्मी चौक येथे झालेल्या कार्यक्रमात ना. नितेश राणे यांचा भाजपाच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या हस्ते महाआरती सोहळा पार पडला. यावेळी बोलताना ना. नितेश राणे यांनी सडेपोडपणे हिंदुत्वाचे विचार मांडले. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना जोमाने काम करण्याचा सल्ला देताना त्यांनी भविष्यात रत्नागिरी हा भाजपचा बालेकिल्ला निश्चितपणे होईल, असे ते म्हणाले. तसेच भाजपाचे काम जिल्ह्यात खूप चांगले आहे.
रत्नागिरी हा भविष्यात हिंदुत्वाचाही बालेकिल्ला झालेला असेल असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. ना. नितेश राणे यांनी भाजपने आयोजित केलेल्या बॉडी बिल्डींग स्पर्धेचेही यावेळी कौतुक केले. तसेच. देवरुख येथे खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी स्पर्धे च्या आयोजनाही त्यांनी कौतुक केले. पक्षाची ताकद वाढत आहे हे या नियोजनातून पहायला मिळाले. भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप हा जिल्ह्यात प्रमुख पक्ष झाल्याचे दिसून येईल असेही ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, केदार साठे, अॅड. बाबा परुळेकर, शहर अध्यक्ष राजन फाळके आदी उपस्थित होते.