रत्नागिरी: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासकामांची गती, शाळांची दुरवस्था आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर मंथन करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेची महत्त्वपूर्ण सर्वसाधारण सभा आज, १ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते आणि आरोग्य व्यवस्थेसह विविध रखडलेल्या प्रकल्पांवरून सदस्य प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता असून ही सभा चांगलीच वादळी ठरण्याचे संकेत मिळत आहेत.
शाळा दुरुस्ती व पोषण आहारावरून प्रशासन रडारवर
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या इमारतींची झालेली दुरवस्था, धोकादायक वर्गखोल्या, नवीन खोल्यांचे प्रलंबित प्रस्ताव आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांचा प्रश्न सभेत प्रामुख्याने उपस्थित केला जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित असणारा शालेय पोषण आहार (MDM) आणि शाळांमधील किचन शेडच्या बांधकामांची सद्यस्थिती यावरही सदस्य प्रशासनाकडून जाब विचारण्याच्या तयारीत आहेत.
जलजीवन मिशन आणि ग्रामीण रस्त्यांचे भिजत घोंगडे
जिल्ह्यात ‘हर घर जल’ पोहोचवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत अनेक योजनांची कामे संथ गतीने सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. कामांची सद्यस्थिती, निधीचे वाटप आणि प्रत्यक्षात नळाला पाणी कधी येणार? याबाबत सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर बांधकाम विभागांतर्गत ग्रामीण रस्त्यांची झालेली चाळण आणि प्रलंबित दुरुस्तीच्या कामांवरूनही खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण आरोग्य यंत्रणा आणि विकास आराखड्यांना मंजुरी
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) आणि उपकेंद्रांच्या इमारतींचे रखडलेले प्रश्न, औषधांचा तुटवडा तसेच रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर होणारा परिणाम याविषयी सभेत सविस्तर चर्चा होणार आहे. याशिवाय चालू वर्षातील विविध विभागांच्या नव्या विकास आराखड्यांना मंजुरी देणे, प्रलंबित ठराव मंजूर करणे आणि नवीन धोरणात्मक निर्णय घेणे या दृष्टीनेही आजची बैठक अत्यंत कळीची मानली जात आहे.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, अर्थ व शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, समाज कल्याण सभापती सुयोग कांबळे, कृषी सभापती महेश नाटेकर यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत.

