रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी १० जून ते १२ जून या कालावधीमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असल्याने नागरिकांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. तसेच काहीही आपत्कालीन संकट येऊ शकते त्यामुळे हे २ दिवस जिल्ह्यामध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला आणि त्यावेळी त्यांनी सांगितले कि, प्रशासनाने नागरिकांची सर्वतोपरी काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन किती प्रमाणात सज्ज आहे त्याचा तातडीने आढावा घ्यावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. तसेच जी गावे पूररेषेवर आहेत तिथे पूर सदृश्य परिस्थिती झाली तर किनाऱ्यालगतच्या अनेक गावांना धोका पोहचू शकतो. त्यांच्या स्थलांतराची व्यवस्था योग्य जागी करावी. या अति पर्जन्य काळामध्ये गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयारीत राहण्याची सुचना देण्यात यावी असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये सांगितले. तसेच अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर्समधील रुग्णांना काहीही अडचण येणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले
जिल्हाधिकारी मिश्रा यांनी ज्यांची खाडी अथवा समुद्र किनारी घरे आहेत त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले जाणार असल्याचे सांगितले. पावसाच्या या काळामध्ये पाळीव गुरे आहेत त्यांना व्यवस्थित गोठ्यातच बांधून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. अति पावसामुळे पूरजन्य परिस्थिती उद्भवली तर पाच तालुक्यांमध्ये फायबरच्या बोटींची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे एनडीआरएफची दोन पथके नियुक्त करण्यात आल्याचीही त्यांनी माहिती दिली आहे. कितीही मोठी आपत्ती आली तरी जिल्हा प्रशासन, नगरपालिका, पोलीस यंत्रणा ,आरोग्य यंत्रणा नागरिकांचे संरक्षण करण्यास सज्ज आहेत.

