कोकण किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात २४ मे ते २८ मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
साऱ्या महाराष्ट्रात रेड अलर्ट – राज्यात रविवारी (२५ मे रोजी) पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये शनिवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. गेल्या ४८ तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकुळ सुरूच आहे. पुढचे दोन दिवस पावसाचा जोर कायम राहिल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अनेक जिल्ह्यांत अलर्ट – रविवारसाठी हवामान खात्याने संपूर्ण महाराष्ट्राला रेड अलर्ट दिला आहे. कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आदी जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भातही पावसाचे वातावरण निर्माण झाले असून अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
खबरदारीचे आवाहन – हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजांच्या कडकडाटादरम्यान झाडांखाली किंवा विद्युत खांबांजवळ उभे राहू नये. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.