सध्या उन्हाळ्याचा मोसम सुरु झाल्याने महिलांची बेगमीची तयारी सुरु झाली आहे. वर्षाचे मुख्य काम म्हणजे वर्षभराचा मसाला बनवून त्याचा योग्य रीतीने साठा करून ठेवणे. रस्तोरस्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात मिरच्या घेऊन व्यापारी बसलेले दिसत आहेत. मिरच्या आणि इतर लागणारे मसाल्याच्या पदार्थांची मोठ्या प्रमाणात रेलचेल व्यापारी वर्गाकडून सुरु आहे.
परंतु, मिरचीच्या दरामध्ये झालेली वाढ बघून महिलांनाच ठसका लागायला लागला आहे. मिरचीच्या किमती तिच्या तिखट ते सौम्य पणावर अवलंबून असतात. त्यामुळे विविध प्रकारच्या मिरच्यांचे दर गगनाला भिडल्याने महिला वर्गाचे मसाला करण्यासाठीचे बजेट पूर्ण कोलमडले आहे. आर्थिक जुळवाजूळव करताना महिलांची दमछाक होत आहे.
सुक्या मिरचीचा दर वाढल्याने लग्न सराईपूर्वी वर्षभर पुरेल इतका मसाला करण्याची सवय असलेल्या गृहिणींना यावर्षीचा मसाला चांगलाच महाग पडणार आहे. सुक्या मिरचीचे दर किलोमागे २०० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत वाढल्याने मसाल्यासाठी लागणारी लाल मिरचीच तिखट झाल्याची प्रतिक्रिया गृहिणींकडून व्यक्त होत आहे. सध्या चवीसाठी लागणार्या बेडगी मिरचीला आणि लाल मिरची घेण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत. लाल मिरचीचे भाव २०० रुपयांपासून ४०० रुपये किलोपर्यंत आहेत.
काही जणांना जेवणामध्ये जालीम तिखट मिरची लागते. त्यामुळे बुटूक मिरची, लवंगी मिरची असे अनेक प्रकार मिरच्यांमध्ये येतात. जेवढी तिखट मिरची तेवढा दर जास्त. वाण कोणत्या मिरची प्रकारच आहे त्यावर सुद्धा मिरच्यांचे दर ठरतात. काही मिरच्या दिसताना लालचुटुक दिसत असल्या तरी त्यांना तिखट पणा मात्र तेवढा नसतो. परंतु पदार्थाला येणारा रंग मात्र आकर्षक दिसतो. परंतु, मिरच्यांचे चढे दर बघून महिला वर्गाच्या मात्र रंग उडाला आहे.