रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणचा आणि कोकणवासीयांच्या दरडोई उत्पन्नाचा टक्का वाढणे गरजेचे आहे. येथील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. त्यासाठी रिफायनरी प्रकल्प उभारला जाईल, अशी ग्वाही माजी’ केंद्रीय मंत्री खासदार नाराण राणे यांनी भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना येथे दिली. कोकण समृद्ध करण्याचा आपला ध्यास असल्याचे सांगतानाच रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकल्प विरोधकांवर राणे यांनी जोरदार टीकाही केली. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नारायण राणे प्रथमच राजापुरात आले होते.
शहरातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी येथील नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, प्रदेश सचिव शिल्पा मराठे, विधानसभा क्षेत्रप्रमुख उल्का विश्वासराव, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, सरचिटणीस अनिल करगुंटकर, तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, तसेच भास्कर सुतार आदी उपस्थित होते. यावेळी रिफायनरीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “कोकणात उद्योगधंदे नाहीत. तरुणांच्या हाताला काम नाही, नोकऱ्या नाहीत.
याची रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना माहिती आहे का? कोकणच्या विकासासाठी औद्योगिक प्रगती काळाची गरज असल्याचे नमूद करत राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणारच. या प्रकल्पाला आता पोषक वातावरण असून विरोध नाही. याबाबत पेट्रोलियम मंत्र्यांशी मी बोललो आहे.” ते म्हणाले, “राजापुरातील पूरस्थितीची पाहणी केली असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. तसेच आंबेवाडी येथील वासूकाका जोशी पुलाचे कामही वर्षभरात मार्गी लावण्यात येईल. पुरात ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना नियमाप्रमाणे भरपाई देण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.”
तर ठेकेदार ब्लॅकलिस्ट – मुंबई-गोवा महामार्गाचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरळीत झाले. मग रत्नागिरी जिल्ह्यात का रखडले? येथे ठेकेदारी आणि टक्केवारी घेणारे अधिक आहेत असेच म्हणावे लागेल. यापुढे या मतदारसंघात होणारे कोणतेही काम दर्जेदारच झाले पाहिजे. दर्जाहीन काम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांना ब्लॅकलिस्टची वाट दाखविली जाईल, असा इशाराही राणे यांनी ठेकेदारांना दिला.