राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची टप्प्याटप्याने अंमलबजावणी करण्यात येत असून, ३ ते ६ वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खासगी केंद्रांची अथवा शाळांची नोंदणी करा, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार बालवाडीच्या नोंदणीसाठी विशेष पोर्टल सुरू केले आहे. त्यावर नोंदणी करावी लागणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये पहिली ५ वर्षे म्हणजे पूर्व प्राथमिक शाळेची ३ वर्षे (वयोगट ३ ते ६) आणि पहिली व दुसरी (वयोगट ६ ते ८) यांचा समावेश केला आहे. सद्यःस्थितीत ३ ते ६ वयोगटातील बालकांना अंगणवाड्या, बालवाड्या शाळांना जोडून पूर्व प्राथमिक वर्ग व खासगी पूर्व प्राथमिक वर्ग यामधून शिक्षण दिले जाते; मात्र आता शासकीय स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या बालवाड्या व अंगवाड्या यांची नोंदणी व माहिती महिला व बालविकास विभाग यांच्याकडे करणे बंधनकारक आहे.
खासगी पूर्व प्राथमिक वर्गाची अधिकृत माहिती सद्यःस्थितीमध्ये शासनाकडे उपलब्ध नाही. वयोगट ३ ते ६ साठी पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खासगी केंद्रांची माहिती एकत्रित स्वरूपात राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर तसेच पालकांनाही उपलब्ध असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत htt://education.maharastra.gov.in या संकेतस्थळावर खासगी बालवाडी नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रियेत केंद्राची माहिती, व्यवस्थापनाचे तपशील, विद्यार्थीसंख्या, उपलब्ध भौतिक सुविधा, कार्यरत शिक्षक यांची माहिती भरणे आवश्यक आहे. या नोंदणीबाबतचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालकाने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.