दरवर्षी गणपती आणि शिमग्याला कोल्हापूरमार्गे कोकणात येण्याची वेळ चाकरमान्यांवर येते. सर्वात सुंदर अशा देवभूमीत स्वतःचा रस्ता नाही, यासारखे दुर्दैव नाही. त्यामुळे गणपतीमध्ये हा महामार्ग गाडी चालवण्यायोग्य करून चाकरमान्यांना कोकणातूनच जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जनआक्रोश समितीने रायगड येथे आंदोलनावेळी केली. जनआक्रोश समितीच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनात समृद्ध कोकण संघटनेचे अध्यक्ष आणि स्वराज्य भूमी अभियानाचे प्रमुख संजय यादवराव यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले होते. भविष्यातील कोकण महामार्गाचे भवितव्य मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांना सांगावे, अशी मागणी आंदोलकांना केली.
या महामार्गाला स्वराज्य भूमी कोकण महामार्ग असे नाव द्यावे आणि त्या त्या गावांच्या जवळ महामार्गावर त्या त्या राष्ट्रपुरुषाची प्रेरणाकेंद्र बनवावीत, अशीही मागणी करण्यात आली. माणगाव बायपास, इंदापूर बायपास युद्धपातळीवर अशा महत्वाचे विषय पूर्ण व्हायला हवेत. ठेकेदार काम करत नाही, अशी कारणे यापुढे सांगू नयेत. झाडे लावण्याची तरतूद असतानाही १७ वर्षे झाली तरीही कोणती झाडे लावली गेली नाहीत. कोकणातील समृद्ध जैवविविधता दाखवणारी सह्याद्रीतली सर्व प्रकारची झाडे महामार्गावर लावावी. जोपर्यंत हा महामार्ग पूर्ण होत नाही आणि सुरक्षित होत नाही तोपर्यंत ग्रीनफिल्ड हायवेसह इतर कोणताही हायवे कोकणात सुरू करू नये, असे समितीने ठामपणे सांगितले.