विकासाची मुहूर्तमेढ तहसीलप्रांत कार्यालयातून सुरू होते. कारण, जमीन आदान- प्रदानाचे काम या ठिकाणी चालते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत होणाऱ्या क्रूझ टर्मिनलसाठी ३०८ कोटींची मंजूर दिली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. येथील अल्पबचत सभागृहाजवळ ५ कोटी रुपये खर्चुन बांधण्यात येणाऱ्या प्रांताधिकारी कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सामंत म्हणाले, ‘महसूल विभाग एका कुटुंबासारखे काम करतो.
माझ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांबाबत तक्रारी ऐकायला मिळत नाही, ही चांगली बाब आहे. ६५ तलाठी कार्यालयांना ३० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. ५ प्रांताधिकारी कार्यालयांसाठी २५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व कार्यालयांमधून जनतेची कामे विना विलंब झाली पाहिजेत. पोलिसपाटील, कोतवालांचे मानधन शासनाने वाढवले आहे. त्यांनीही चांगले काम करून शासनाचा मान वाढवावा.
रत्नागिरीत होणाऱ्या क्रूझ टर्मिनलसाठी निधीची गरज होती. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी लावून धरल्यामुळे रत्नागिरीत क्रूझ टर्मिनलसाठी ३०८ कोटी मंजूर केले आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी जीवन देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, बिपिन बंदरकर आदी उपस्थित होते.