रत्नागिरी पालिकेचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांना शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी नगर अभियंता यतिराज तुकाराम जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा एकमुखी ठराव आजच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला. संबंधित c. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी या ठरावास मंजुरी दिली आणि हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. पालिकेची विशेष सभा आज नगराध्यक्षा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. २२ जानेवारी २०२६ ला उपनगराध्यक्ष समोर तिवरेकर हे नगरपालिकेतील कंत्राटी इंजिनियर रोहन डांगे यांच्याकडे शहरातील शौचालयांच्या बांधकामाचे एस्टिमेट व निविदा कागदपत्रांची मागणी करत होते. यावेळी अभियंता यतिराज जाधव यांनी आपल्या केबिनमधून बाहेर येऊन उपनगराध्यक्षांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली आणि अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. आज या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे गटनेते राजेश तोडणकर आणि शिवसेना-भाजप युतीच्या सर्व नगरसेवकांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला. जर संबंधित अभियंत्यावर कारवाई झाली नाही, तर आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकू, असा इशारा नगरसेवकांनी दिला. ‘मी केवळ विकासकामांच्या कागदपत्रांची विचारणा करत होतो. प्रशासकीय कारभार संपून आता लोकप्रतिनिधींचे कामकाज सुरू झाले आहे, हे कर्मचाऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे’, असे तिवरेकर यांनी सांगितले. नगरसेवक आणि प्रशासन यांच्यातील हा वाद आता जिल्हाधिकारी स्तरावर पोहोचला आहे. या प्रकरणाने संपूर्ण रत्नागिरी शहराचे लक्ष वेधून घेतले असून, आगामी काळात प्रशासकीय शिस्त आणि लोकप्रतिनिधींचा सन्मान यावर मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे.
खुलासा चुकीचा ठरवत फेटाळला – अभियंता यतिराज जाधव यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी खुलासा सादर केला होता. त्यामध्ये त्यांनी सर्व आरोप ‘एकतर्फी’ असल्याचे म्हटले होते. माझ्याकडून कोणताही शिस्तभंग झालेला नाही, सीसीटीव्ही फुटेजची तटस्थ तपासणी व्हावी, अशी विनंती त्यांनी केली होती; मात्र, प्रत्यक्षदर्शी कर्मचारी आणि नगरसेवकांच्या साक्षीनंतर सभागृहाने हा खुलासा चुकीचा ठरवत फेटाळून लावला आहे.

