‘कोकणातला माणूस सुखी समाधानी रहावा हा ध्यास आपण कायम मनात बाळगलेला आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्यावेळी तसा प्रयत्नही आपण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता पुन्हा एकदा कोकणचा कायापालट करण्याची संधी आलेली आहे. त्यामुळे मोदींनी दिलेल्या ‘चारशे प्रार’च्या निर्धारात कोकणातली ही जागा जिंकून आपला हक्काचा खासदार संसदेत पाठवा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या’, असे आवाहन महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांनी केले.
महायुतीच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा शुक्रवारी दुपारी येथील राजीव गांधी स्टेडियमवर झाली. सभेला तुफान गर्दी लोटली होती. यावेळी बोलताना उमेदवार नारायण राणे यांनी हे आवाहन केले.
सुजलाम सुफलाम – कोकणातील बेकारी दूर करण्यासाठी भविष्यात कोकणात उद्योग व्यवसाय यावेत यासाठी मी प्राधान्य देणार आहे. मी केंद्रात उद्योग मंत्री आहे, पालकमंत्री उदय सामंत राज्यात उद्योग मंत्री आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सर्वांचे सहकार्याने कोकण आणि कोकणातील जनतेला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी वचनबद्ध आहे अशी ग्वाही राणे यांनी यावेळी दिली.
अब की बार चारसो पार – ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ४०० पार खासदार निवडून देत हा विकसित देश बनविण्याचा संकल्प असून त्यात कोकणची जागा असावी यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे नाव जगात सर्वोच्च पातळीवर नेले आहे. आज जागतिक अर्थिक व्यवस्थेत भारत पाचव्या क्रमांकावर आहे तो आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिले, विविध प्रकारच्या ५४ योजना देशातील जनतेसाठी दिल्या. आजारपणावर मात करण्यासाठी आयुष्यमान भारत ही योजना सुरु करत ५ लाखापर्यंतचे उपचार मोफत दिले. असे कर्तृत्ववान नेतृत्व मोदीच पंतप्रधान व्हावेत, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगिण विकास व्हावा, या देशातून गरिबी नष्ट व्हावी, तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आपण कटीबध्द असल्याचे ना. राणे यांनी सांगितले.
मी आणि सामंत दोघं मिळून… – आपल्या उद्योगमंत्रालयाच्या माध्यमातुन भविष्यात या ठीकाणी उद्योगधंदे यावेत भविष्यात कोकणातील बेरोजगारी दूर करण्यासाठी मी व उदयोगमंत्री उदय सामंत काम करू, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आपल्याला यासाठी भक्कम् साथ आहे. इथे उद्योगधंदे यावेत, इथल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करूया, कोकणसाठी सगळ्यांनी एकत्र येऊन येऊन काम करूया, कोकणचा कॅलिफोर्निया नव्हे तर कोकण बघून तसा कोकणसारखा विकास करण्याची इच्छा जगाला निम णि व्हावी असे आपण काम करूया असे आवाहन राणे यांनी यावेळी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ४०० पार मधे तुमचा हक्काचा माणूस असावा यासाठी कमळावर समोरिल बटण दाबून मला मतदान करा मी कोकणच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे अशी ग्वाही यावेळी राणे यांनी दिली.