कोकणचा ढाण्या वाघ म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग या शिवसेनेच्या (ठाकरे गट) बालेकिल्ल्यात दणदणीत विजय मिळविला. ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा त्यांनी ४८ हजारांपेक्षा अधिक मते मिळवत पराभव केला. या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. राणे यांच्या या विजयाने जवळपास ५० वर्षांनंतर कोकणात कमळ फुलल्याने भाजपा कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात बाजी कोण मारंणार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागून होती. या मतदारसंघात विनायक राऊत यांच्या नावाची हवा होती. त्यातच काहींचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे राऊत हमखास निवडून येणार असे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात होते. मात्र नारायण राणे यांनी जबरदस्त विजय मिळवत सारी समिकरणे फोल ठरविली आहेत.
पहिल्या फेरीपासून मताधिक्य – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एफसीआय गोडावून येथे मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली. पहिल्या फेरीतच राणेंनी ७०० चे मताधिक्य घेतले. दुसऱ्या फेरीत राऊतांना मताधिक्य मिळाले. मात्र तिसऱ्या फेरीनंतर राणे यांनी दमदार मताधिक्य घेत राऊतांची घोडदौड रोखून धरली.
धक्कादायक निकाल – ४ जून रोजी विनायक राऊत निवडून येतील असा कयास अनेकांनी बांधला होता. मात्र मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर एकामागोमाग एक धक्के देणारी आकडेवारी बाहेर येत होती. सुरूवातीपासूनच राणे आघाडीवर होते. ते शेवटपर्यंत आघाडीवर राहिले. या धक्कादायक आकडेवारीमुळे शिवसेना गोटात नैराश्य पसरले.
सन्नाटा निर्माण झाला – एकामागोमाग एक अशा फ ऱ्यांमध्ये राणे विजयी मताधिक्य घेत होते. मताधिक्याची आकडेवारी वाढत गेल्यानंतर शिवसेनेच्या गोटात मोठा सन्नाटा निर्माण झाला. कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घ्यायला सुरूवात केली. हळूहळू तेथील गर्दी
ओसरू लागली होती.
आ. राजन साळवी ठाण मांडून – शिवसेनेला विजयाची खात्री होती. शिवसेनेचे आमदार राजन साळवी, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड आदींसह प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी ठाण म ांडून बसले होते. साऱ्यांच्या चेहऱ्यावर नैराशाची छटा दिसून येत होती.
भाजपच्या गोटात जल्लोष – एकीकडे शिवसेनेच्या (ठाकरे गट) गोटामध्ये सन्नाटा निर्माण झालेला असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. स्वतः नितेश राणे कार्यकर्त्यांसोबत ‘जल्लोष साजरा करीत होते. जसजसा निकाल बाहेर येत होता तसतसा कार्यकर्त्यांचा जल्लोष अधिकच वाढत होता.
नारायण राणे दाखल – नारायण राणे यांना ३० हजारांचे मताधिक्य मिळाल्यानंतर स्वतः राणे मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. यावेळी त्यांनी काहीकाळ मतमोजणी ठिकाणी थांबणे पसंत केले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळत होता. लवकरच मी प्रसारमाध्यमांशी बोलेन असे सांगून राणे पुन्हा मतम ोजणी केंद्रातून बाहेर पडले.
गुलाल उधळला मतमोजणी – केंद्रातून बाहेर पडल्यानंतर ज्या ठिकाणी कार्यकर्ते थांबले होते त्या ठिकाणी ते आले. राणेंचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. यावेळी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यामध्ये निलेश व नितेश राणे हे दोघेही मागे नव्हते.
विजयी घोषित – २४ व्या फेरीचा निकाल आला आणि नारायण राणे यांनी सुमारे ५२ 1 हजारांचे मताधिक्य घेतले. या फेरीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नारायण राणे यांना विजयी घोषित केले. त्यांच्या विजयाची घोषणा होताच मतदान केंद्राबाहेर फटाक्यांची आतषबाजी पहायला मिळाली.
शिंदे सेनेची पाठ – निवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना भाजप कार्यकर्ते जल्लोष साजरा करीत होते. मात्र त्यांच्या जल्लोषात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मात्र कुठे पहायला मिळाले नाहीत. मतमोजणीच्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याने भाजपच्या गोटात चर्चांना उधाण आले होते.