महाराष्ट्र शासनाच्यावतीने कोकण किनारपट्टीवर बांधण्यात येणाऱ्या रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी मंडणगड तालुक्यातील बाणकोट, नारायणनगर, वेळास, साखरी गावातील सुमारे १५३४.६८ जमीन अधिगृहित करण्यात येणार आहे. याबाबतचे महाराष्ट्र शासन राजपत्र २४ एप्रिल २०२३ ला प्रसिद्ध झाले आहे.रेवस-रेड्डी सागरी विशेष महामार्ग म्हणून या महामार्गाला विशेष दर्जा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे या महामार्गाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी मंडणगड तालुक्यातील ४ गावांमध्ये अधिकचे भूसंपादन होणार आहे. याच मार्गावर गेल्या दहा वर्षापासून बहुचर्चित बाणकोट- बागमांडला सागरी सेतू व साखरी व केळशीला जोडणारा पूल अर्धवट बांधकाम केलेल्या अवस्थेत रखडलेले आहेत.
महामार्गामुळे रखडलेले हे दोन्ही पूल पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच मार्गावर वेळास हे कासवाचे गाव असल्याने त्याच्या विकासात्मक प्रवाहाला गती मिळेल. महामार्गाची निर्मितीची आधीच चाहूल लागलेल्या जमीन दलाल व मोठ्या गंतवणुकदारांनी चार गावातील महामार्गालगतच्या जमिनीची गेल्या तीन ते चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. येथील शेतकरी व जमीनमालकांनी अगदी कवडीमोल भावाने आपल्या जमिनी संबंधितांना राजपत्र जाहीर होण्याआधीच विकल्या आहेत.