महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे दिलेले कोणतेही काम पूर्ण योगदान देऊन करत असतात. महसूल सप्ताहातही सर्वांनी चांगले काम केले आहे. आपण असेच काम करत कामामध्ये सातत्य ठेवा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्ट महसूल सप्ताहात विविध उपक्रम राबवण्यात आले. या सप्ताहाची सांगता झाली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी जास्मीन, प्र. अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.
पालकमंत्री सप्ताहामध्ये दोनवेळा कार्यक्रमांना उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे प्रमाणिकपणे व उत्स्फूर्तपणे काम करत असतात. महसूल विभागामार्फत राबवण्यात आलेल्या महसूल सप्ताहातही त्यांनी चांगले काम केले. एकमेकांमध्ये समन्वय ठेवून सांघिक काम केल्याने ते शक्य झाले. महसूल सप्ताहात जिल्ह्याने केलेल्या कामाचे. नियोजनाचे विभागीय आयुक्तांनी कौतुक केले. भविष्यातही असेच काम कराल. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी साठे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.