तालुक्यात लवकरच औद्योगिक क्रांती होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रयत्नांना यश आले असून, रिळ-उंडी येथे संरक्षण विभागाचा रणगाडे बनवणारा एक कारखाना, निवेंडीत मँगो आणि कॅश्यू पार्क तर वाटद यथे अंबानी ग्रुपचा डिफेन्स क्लस्टर असे प्रदूषणविरहित तीन प्रकल्प होणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाच दिवसांचा सर्व्हे संबंधित एजन्सीने केले आहेत. या उद्योगांना लागणाऱ्या जमिनीचे संपादन अंतिम टप्प्यात आहे. ४५ लाख एकर याप्रमाणे जमिनीला दर दिला जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत नोकऱ्यांसाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणी जिल्ह्यातील तरुणांचे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी झटत होते. त्यांच्या या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. एक, दोन नव्हे तर तीन प्रकल्प रत्नागिरी तालुक्यात येऊ घातले आहेत. त्यामुळे त्यांचा दाओसचा दौरा रत्नागिरीसाठी फलदायी ठरला आहे, असे म्हणावे लागले. तालुक्यातील रिळ उंडी येथे निबे यांच्या कंपनीचा संरक्षण विभागाचा मोठा प्रकल्प होणार आहे.
या प्रकल्पातून संरक्षण विभागाला लागणारे रणगाडे बनवले जाणार आहेत. त्यासाठी २०५.०२३२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. निवेंडी येथे मँगो आणि कॅश्यू प्रकल्प होणार आहे. त्यासाठी १०४ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. यासाठी १४४.९९ कोटी रुपयांची मागणी प्रशासनाने एमआयडीसीकडे केली आहे. या मँगो पार्क आणि कॅश्यू पार्कमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच आंबा, काजू व्यावसायिक एकत्रित जोडले जाणार आहेत तसेच आंबा आणि काजू फळावर आधारित सर्व प्रकिया उद्योग एकाच ठिकाणी सुरू होणार असल्याने व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे तसेच यातून मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना रोजगार निर्मिती होणार आहे. वाटद येथे अंबानी ग्रुपचा डिफेन्स क्लस्टर हा प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पासाठी पाच गावातील भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी ३ गावातील भूसंपादन झाले, महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही अधिकृत माहिती दिली.
एकराला ४५ लाखांचा दर – रिळ-उंडी आणि निवेंडीतील भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्याची आता ही प्रक्रिया निवाड्यावर आली आहे. २०५.०२३२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यासाठी २५४ कोटी ९४ लाखांची गरज आहे तर निवेंडी येथे १०४.०१ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यासाठी १४४ कोटी ९९ लाख रुपये लागणार आहे. ही जमीन ४५ लाख रुपये एकर याप्रमाणे जमिनीला दर मिळणार आहे. सुमारे चार ते पाचपट हा दर असणार आहे.