तांदूळ उत्पादक पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश यांसारख्या प्रमुख राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तांदूळ उत्पादनावर चिंता वाढली आहे. या वर्षी आधीच गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आणि साखरेची वाहतूक मर्यादित केली. आणि आत्ता तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने तुटलेल्या तांदळाच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. या संदर्भात आदेशही जारी करण्यात आला असून हा आदेश आजपासून लागू होणार आहे. यापूर्वी तुटलेल्या तांदळाच्या निर्यातीवर कोणतेही शुल्क लागत नव्हते.
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. हा आदेशही आजपासून लागू होणार आहे. मात्र, उकडलेले आणि बासमती तांदळाची निर्यात या निर्बंधातून बाजूला ठेवण्यात आली आहे. लक्षात घेण्यासारखे की भारत हा चीननंतरचा दुसरा सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे. जागतिक तांदूळ उत्पादनात भारताचा वाटा २० टक्के आहे.
महसूल विभागाच्या अधिसूचनेनुसार तांदूळ आणि तपकिरी तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने सांगितले की, उकडा तांदूळ आणि बासमती तांदूळ व्यतिरिक्त इतर जातींच्या निर्यातीवर २० टक्के सीमा शुल्क आकारले जाईल. हे निर्यात शुल्क ९ सप्टेंबरपासून लागू होणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.
निर्यात शुल्क लावण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना अखिल भारतीय तांदूळ निर्यातदार संघटनेचे माजी अध्यक्ष विजय सेटिया म्हणाले की, भारतीय तांदूळ अत्यंत कमी किमतीत निर्यात होत आहे. निर्यात शुल्कामुळे बिगर बासमती तांदळाची निर्यात २० ते ३० लाख टनांनी कमी होईल. त्याचबरोबर २० टक्के निर्यात शुल्कामुळे निर्यातीतून होणाऱ्या वसुलीवर कोणताही परिणाम होणार नाही.