आंबा-काजू बागायतदारांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला विमा परतावा रक्कम मंजूर झाली असून, टप्प्याटप्प्याने ती बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ हजार ४६८ आंबा-काजू बागायतदारांनी मागील वर्षी विमा उतरवलेला होता. त्याअंतर्गत १०० कोटी ६१ लाख १४ हजार ५९३ इतकी रक्कम मंजूर झाली आहे. त्यामुळे बागायतदारांची दिवाळी गोड झाली आहे. उशिरा का होईना; पण पुढील हंगामाच्या तोंडावर विमा परतावा मिळाल्याने बागायतदारांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वातावरणातील कोकणातील बदलांमुळे आंबा-काजू बागायतदारांचे होणारे नुकसान भरून निघावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाने फळपीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून विशिष्ट रक्कम हप्त्यापोटी घेतली जाते. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ३० हजार १३५ आंबा बागायतदार आणि तीन हजार ३३३ काजू बागायतदारांनी विमा उतरवला होता. एकूण १८ हजार २४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते.
शेतकऱ्यांनी हप्त्यापोटी २१ कोटी ७४ लाख भरले, तर केंद्र, राज्य आणि शेतकरी मिळून एकूण १०८ कोटी ५४ लाख रुपये विमा कंपनीला देण्यात आले होते. हंगाम १५ संपल्यानंतर दिवसांत ट्रिगरची माहिती संकलित करून ४५ दिवसांत परतावा देणे बंधनकारक आहे. मात्र, तीन महिने उलटल्यानंतरही कंपनीकडून कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केले. त्याची गंभीर दखल बंदरे व मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री नीतेश राणे यांनी घेतली. त्यांनी तातडीने मंत्रालयात बैठक घेऊन दिवाळीपर्यंत परतावा मंजूर करावा,’ अशा सूचना दिल्या. त्यानंतर विमा कंपनीकडून कार्यवाहीला वेग आला. चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विमा मंजूर झाला, तर रत्नागिरी जिल्ह्याच्या परताव्यास दोन दिवस विलंब झाला.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच रविवार सुटी असूनही, मंजूर रक्कम बागायतदारांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील हंगामात शेवटच्या टप्प्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाकडून मदतीची अपेक्षा होती; ती पूर्ण न झाल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. मात्र, विमा परतावा मंजूर झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे ते सांगत आहेत. दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात काजूसाठी एकाही बागायतदाराला विमा परतावा मंजूर झालेला नाही. तसेच सर्वाधिक आंबा क्षेत्र असलेल्या या तालुक्यात तुलनेने विमा रक्कमही कमी मिळालेली आहे. संगमेश्वर, लांजा, मंडणगड या तालुक्यांमध्ये आंबा क्षेत्र कमी असतानाही अधिक परतावा मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाली, पावस परिसरातही परतावा रकमेतील तफावत निदर्शनास आली आहे.

