राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने दरपत्रक जाहीर केले आहे. कोणत्याही खासगी बस वाहतूकदाराने या दराच्या ५० टक्के अधिक (दीडपट) आकारणी करण्यास परवानगी आहे. दीडपटापेक्षा जास्त भाडे आकारणी झाल्यास प्रवाशांनी ०२३५२-२२५४४४ या व्हॉटस्अॅप क्रमांकावर वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रवाशांच्या हितासाठी हे दर जाहीर केले आहेत. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात दाखल होतात. त्या वेळी खासगी ट्रॅव्हलधारकांकडून प्रवाशांची लूट केली जाते. दोन ते अडिच पट भाडे आकारले जाते. तसेच रत्नागिरी रेल्वेस्थानकासह अन्य ठिकाणी रिक्षाचालकांकडून रत्नागिरीत येण्यासाठी अव्वाच्यासव्वा भाडे घेऊन गरजू प्रवाशांची लूट केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आरटीओंकडे गेल्या होत्या. त्यावरून त्यांनी प्रवाशांच्या हितासाठी दरपत्रक जाहीर केले आहे. या दरापेक्षा जास्त भाडे आकरल्याची तक्रार केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
या मार्गामध्ये रत्नागिरी ते मुंबई अनुक्रमे – साधे ५२५ रुपये, शिवशाही (वातानुकूलित) ८१५ रु., शयनयान (विना वातानुकूलित) ७१० रु. रत्नागिरी ते ठाणे ५०५ रु., ७५० रु., ६९०रु. रत्नागिरी ते बोरिवली ५५० रु., ८१५ रु., ७५० रु. रत्नागिरी ते पुणे/पिंपरी ४९० रु., ७२५ रु., ६६५ रु.. चिपळूण ते मुंबई ३९० रु., ५८५ रु., ५३५ रु. चिपळूण ते पुणे ३६० रु., ५३०रु., ४८५ रु. दापोली ते मुंबई ३५० रु., ५२० रु., ४७५ रु. दापोली ते ठाणे ३६० रु., ५३० रु., ४८५ रु. दापोली ते बोरिवली ३७५ रु., ५५५ रु., ५१० रु. व दापोली ते पुणे/पिंपरी ३५० रु., ५२० रु., ४७५ रु. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने शेअर ए रिक्षा थांबे व दरपत्रक देखील ठरवून दिलेले आहेत. त्यानुसारच प्रवाशांनी भाडे द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.