रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा लोटे मधील उद्योगांना जबर फटका बसला आहे. परदेशातून मागणीच नसल्याने येथील अनेक उद्योगांचे ७० टक्के प्लांट बंद पडले असून फक्त ३० टक्के उत्पादनच घेतले जात आहे. त्यामुळे हे उद्योग अडचणी आले असून मोठ्या प्रमाणात कामगार कपातही करण्यात आली आहे. अशी परिस्थिती राहिल्यास उद्योजकासमोर गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील लोटे येथे मोठे औद्योगिक वसाहत असून अनेक रासायनिक तसेच अन्य उत्पादन घेणारे कारखाने येथे आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून लोटे एमआयडीसीकडे पाहिले जाते. येथील उत्पादने केवळ देशातच नव्हे तर परदेशात देखील निर्यात केली जातात. येथील उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक तसेच परप्रांतीय असे सुमारे ४० हजार कामगारांना येथे रोजगार उपलब्ध होत असतो.तसेच अनेक ठेकेदारांना देखील येथे छोटे-म ठे व्यवसाय, उद्योग उपलब्ध होत असतात. त्यामुळे लोटे एमआयडीसी हे रत्नागिरी जिल्ह्यातील आर्थिक जडणघडणीचे केंद्र बनले आहे.
युद्धाचा परिणाम? – परंतु आता येथील उद्योग अडचणीत आले आहेत. एखाद्या युद्धाचा किती घातक परिणाम होऊ शकतो हे आता लोटे एमआयडीसीत दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध अद्यापही सुरू आहे. त्यामुळे परदेशातून असलेली मागणी घटली असून त्याचा थेट परिणाम येथील उत्पादनावर झाला आहे. मागणीच नसल्याने उत्पादन बंद करण्याची वेळ येथील उद्योजकावर आली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे तब्बल ७० टक्के प्लांट बंद पडले आहेत. फक्त ३० टक्के इतकेच उत्पादन येथे घेतले जात आहे.
८० टक्के प्लांट बंद – गेल्या ३० ते ४० वर्षात एकही प्लांट बंद करण्याची वेळ आली नव्हती. मात्र आता तब्बल ७० ते ८० टक्के प्लांट बंद पडले असूनही अतिशय गंभीर बाब असल्याचे येथील उद्योजकांचे म्हणणे आहे. उत्पादनच बंद असल्याने कामगार. कपात देखील करावी लागत असून उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल येथील कामगार आपल्या प्रांतात परतले आहेत. स्थानिक व परप्रांतीय असे सुमारे ४० हजार कामगार येथे कार्यरत होते परंतु आता फक्त १० ते १२ हजार कामगारच येथे कामावर आहेत.
परिस्थिती बिकट – पुढील काही महिन्यात परिस्थिती बदलेल असा आशावाद उद्योजकांना आहे. परंतु अशीच परिस्थिती कायम राहिल्यास येथील उद्योग क्षेत्राला फार मोठा फटका बसेल, अशी भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. कोकणात नवीन उद्योग तर येतच नाहीत. मात्र आहेत ते उद्योग देखील अडचणीत येत असल्याने कोकणात रोजगाराचा प्रश्न अधिक बिकट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.