सांगलीतील अहिल्यादेवी यांच्या स्मारकाच्या वादावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या स्मारकाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्याचे योजिले असताना यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनीदेखील शरद पवारांवर टीका केली आहे. तसेच, काही दिवसांपुर्वीच या स्मारकाचे उद्घाटन आपण केल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे. त्यानंतर आज सदाभाऊ खोत यांनी पवारांवर खोचक शब्दात निशाणा साधला आहे.
सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर आले होते. रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावण्याचे काम केले, त्यामुळे त्यांचे पवार आडनाव बदलून आगलावे ठेवावे,अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. सांगली येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा पुतळा अनावरण कार्यक्रमाबाबत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, शरद पवार हे महान नेते आहेत. परंतु, त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केले नाही. जाणार तिथं आग लावायची आणि एक झाले कि परत दुसऱ्या घराला आग लावायला निघून जायचं. त्यांचं सर्व आयुष्य हे आग लावण्या मध्येच गेले आहे. त्यामुळे त्यांनी सद्याचे हे आडनाव बदलून ‘आगलावे’ करून घ्यावे. हे राज्य त्यांच्या काडी लावल्याने होरपळून निघाले असून, त्यांनी आता थांबलं पाहिजे,’ अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
सदाभाऊ खोत यांनी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेला विषय शिवसेना नगरसेवक, मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर विभागाला सापडलेल्या “त्या” डायरीबद्दलही टीका केली आहे. प्रत्येकालाच आपापल्या मातोश्री प्रिय असतात, श्रद्धास्थान असते. पण म्हणून आपल्या आईसाठी करणारी गोष्ट कोणी कुठेही लिहून ठेवत नाही. पण अलीकडं नामकरण झालेल्या मातोश्रींच्या उपकारांची परतफेड केल्यानंतर लिहून ठेवले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.