सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांचा अधिवास सुरक्षित ठेवण्याचे खरे आव्हान वनविभागासमोर आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कोयना व रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवरील डोंगरातील अवैध बांधकामे व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र अधिवासाच्या मुळावर येणार आहे. ही अतिक्रमणे प्रकल्पाचा मूळ हेतू धोक्यात आणू शकतात. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र राखीवच्या यंत्रणेने तातडीने या आक्रमणांना पायबंद घालणे गरजेचे आहे. कृषी पर्यटनाच्या नावाखाली अनेक अवैध बांधकाम सह्याद्रीच्या डोंगरावर बांधली जात आहेत. सह्याद्री वाचवा अभियान हे सातारा व रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाले आहे.
गावक्षेत्रातील खासगी जमिनी विकल्या जाणार नाहीत, असे काही ठराव गावाकडून होऊ लागले आहेत. असे असतानाही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील गावे आणि तेथील जमिनी धनदांडग्यांना विकल्या जात आहेत. कुंभार्ली घाटातील शेकडो एकर जमीन पुण्यातील एका कंपनीने विकत घेतली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एकूण विस्तार साडेचारशे चौरस मैल असून, कोअर झोन २३२.७१ चौरस मैल तर बफर झोन २१८ चौरस मैल इतका आहे. २००८ मध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावली, पाटण; सांगली जिल्ह्यातील शिराळा, चांदोली, अभयारण्य तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, चिपळूण आणि खेड या क्षेत्रांना मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली होती. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात २१ गावे तर बफरक्षेत्रामध्ये ६० गावे आहेत.
या प्रकल्पाला व्याघ्र प्राधिकरणाने मान्यता देऊनही येथे वाघ नसल्याची आवई उठवली होती; मात्र दोन वर्षांपूर्वी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये चांदोली अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले होते. तसेच वन्यजीव प्राधिकरणाने या क्षेत्रात सात नर आणि मादी वाघांच्या जोड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वन्यजीवांचे संरक्षण आणि येथील अन्नसाखळी टिकवण्याचे प्रयत्न सुरू असताना येथील वाढती बांधकामे हा चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. गुजरातसह मुंबई, पुण्यातील काही धनदांडग्यांनी चिपळूण कोयना या भागातील डोंगरावरील जमिनी खरेदी केल्या आहेत.
या ठिकाणी पक्की बांधकामे करून घरे बांधली जात आहे. घर आणि इतर सुविधांसाठी झाडे तोडली जात आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. त्यांना वीज, पाणी आदी सुविधा मिळाल्या आहेत. त्यामुळे व्याघ्र अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. सह्याद्रीमधील राखीव वनक्षेत्रांना लागून असणाऱ्या खासगी जमिनीत देखील वन्यजीव अधिवासाच्यादृष्टीने घातक ठरत आहेत. कारण, या खासगी जमिनीवर पिकांची लागवड होत आहे. यासाठी जमिनीवर नैसर्गिक वाढलेले जंगल कापून त्याला कुंपण घातले जात आहेत.