मुरुड येथील अनिल परब यांच्या रिसॉर्ट पाडण्याच्या कार्यवाहीबाबत पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या गुरुवारी दि. २२ दापोलीत आले होते. मुरुड येथील साई रिसॉर्टशेजारी असलेल्या सी काँच रिसॉर्टच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला फरार म्हणून घोषित करावा, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे, असे सोमय्या यांनी सांगितले. तसाच गुन्हा अनिल परब यांच्यावरही दाखल करण्यात येईल. या गुन्ह्यात तीन वर्षापर्यंत जेलची शिक्षा आहे. हे रिसॉर्ट बांधण्यासाठी पैसे कुठून आले याची चौकशी प्राप्तीकर विभाग व ईडीकडून करण्यात येत आहे. हे रिसॉर्ट पडले की त्याचीही चौकशी होईल, अशी माहिती सोमय्या यांनी दिली.
किरीट सोमय्या यांनी दापोली दौऱ्यावेळी, मुरुड येथील साई रिसॉर्ट दसऱ्यापर्यंत जमीनदोस्त होईल, अशी माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले,‘ तत्कालीन पालकमंत्री अनिल परब हे कोविड काळात मुरुड येथे रिसॉर्ट बांधत होते. सदानंद कदम यांनी चौकशीवेळी लिहून दिले आहे की, परब यांनी मला रिसॉर्ट विकले. याचाच अर्थ हे मूळ रिसॉर्ट अनिल परब यांचेच आहे. लाईट व कर लावण्यासाठी अनिल परब यांनीच अर्ज केला आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हाही लवकरच दाखल होईल, यासाठी जास्तीचे पुरावे आपण पोलिसांना दिले आहेत.
या रिसॉर्टचे वीजबिल परब यांच्याच नावाने येते आहे. रिसॉर्ट सीआरझेडमध्ये बांधणे हा गुन्हा आहे. यामुळे हे भ्रष्टाचाराचे स्मारक दसऱ्याला तुटेल, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. या वेळी त्यांनी प्रांताधिकारी शरद पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पटेल यांची भेट घेऊन साई रिसॉर्ट कारवाईसंबंधी माहिती घेतली.