राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून विनातिकीट प्रवास करणे गुन्हा आहे. त्याप्रमाणे पैसे देऊन तिकीट न देणे हा सुद्धा गुन्हा आहे. त्यावर महामंडळाकडून कारवाई करण्यात येते. कारवाई करताना महामंडळाकडून वेतनवाढ रोखण्यासह अन्य कारवाई केली जाते. गेल्या वषर्षभरात १२२ वाहकांवर रत्नागिरी विभागात कारवाई करण्यात आली आहे. विनावाहक बसमध्ये अडचण येत नाही; परंतु वाहक गाडीत असताना प्रवाशांकडून पैसे घेऊनही तिकीट दिले जात नाही. सुटे पैसे देवाणघेवाण करताना चुकून गडबडीत तिकीट देण्याचे राहून जाते. गर्दी असली तरी असे होते.
तपासणीत वाहक दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. वेतनवाढ रोखण्यात येते. त्यामुळे तिकीट देणे वाहकाची जबाबदारी तर आहेच शिवाय तिकीट घेणे प्रवाशांची जबाबदारी आहे; मात्र तिकिटाचे पैसे घेऊन तिकीट न देणे एसटीच्या १२२ वाहधारकांना महागात पडले आहे. या वाहनधारकांवर कारवाई झाली असून त्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. विनातिकीट प्रवासी आढळला तर त्याच्या प्रवासभाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा १०० रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून वसूल केली जाते.