शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊनही जिल्हा शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार काही सुधारण्याचे नाव घेईना. भूलतज्ज्ञ नसल्याने अनेक शस्त्रक्रिया खोळंबल्या आहेत. वेळेत भूलतज्ज्ञ न मिळाल्याने एका गर्भवती महिलेला बाळ गमवावे लागले. तिची प्रकृती गंभीर आहे. अन्य रुग्णांची फरफट होत आहे. शिवसेनेचे रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आमचा अंत पाहू नका, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या हातात ही परिस्थिती राहली नसल्याचे स्पष्ट करत हात वर केले.
सर्वसामान्यांचे रुग्णालय म्हणून जिल्हा रुग्णालय ओळखले जाते. रुग्णालय अद्ययावत करण्यासाठी कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू आहेत. अनेक सुसज्ज विभाग आहेत; परंतु त्यासाठी लागणारे मनुष्यबळच नसल्याने हे सर्व कुचकामी ठरत आहे. जिल्हा रुग्णालयात वर्ग एकच्या तज्ज्ञ डॉक्टरांची ८० टक्केच्या वर पदे रिक्त आहेत. वर्ग दोनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची परिस्थिती तीच आहे. भूलतज्ज्ञाची अनेक वर्षांपासून मागणी आहे; परंतु शासनाला आणि प्रशासनाला एक भूलतज्ज्ञ उपलब्ध करून देता आलेला नाही. त्याचा मोठा फटका एका कुटुंबाला बसला आहे.
शिवसेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, महिला पदाधिकारी राजेश्री शिवलकर आदी जिल्हा रुग्णालयात कामानिमित्त गेले होते. तेव्हा एक गंभीर बाब पुढे आली. त्या महिलेचे सीझर करायचे होते. बाळ पोटात दगावल्यामुळे ऑपरेशन होणे आवश्यक होतं; परंतु भूलतज्ज्ञ नसल्याने वेळेत ऑपरेशन झाले नाही आणि आता त्या महिलेची प्रकृती गंभीर आहे. त्या कुटुंबाच्या नातेवाईकांचे अश्रू पाहून साळुंखे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सहनशीलतेचा अंत पाहू नका. जमत नसेल तर रुग्णालयाला टाळे लावा, अशा भाषेत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुनावले. यावर उत्तर देताना वैद्यकीय अधिकारी म्हणाले, आम्हीदेखील याचा पाठपुरावा करत आहोत.