आता कोकणातही वाळूमाफियांचीही शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याइतपत मजल गेली आहे. रत्नागिरीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर शुक्रवारी सकाळी दोघांनी हल्ला केला. या महिला अधिकाऱ्याने समयसूचकता दाखवून दोघांना इंगा दाखवला… त्याचीच चर्चा संपूर्ण रत्नागिरी शहर आणि परिसरात सुरू आहे. हल्ला करणाऱ्या वाळूमाफियांना आपण कोणाशी पंगा घेतो आहे? हे समजले नाही आणि कराटेपटू असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना चांगलाच प्रसाद दिला. दरम्यान, दिवसाढवळ्या जर उपजिल्हाधिकारी पदासारख्या खासकीय अधिकाऱ्यावर हल्ला होत असेल तर संबंधित शासकीय यंत्रणा मूग गिळून गप्प बसणार काय? असा सवाल जनतेतून करण्यात येत आहे.
नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकला गेलेल्या उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम (वय ४९) यांच्यावर फावड्याने हल्ला करण्यात आला. मात्र कराटे चॅम्पियन असलेल्या गेडाम यांनी तो परतावून लावला आणि उलट या हल्लेखोरांनाच चोप दिला. रत्नागिरी शहरानजिक असलेल्या पांढरा समुद्र येथे ही घटना घडली. उपजिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या मोबाईलवरून शूटींग सुरू केले. त्यावेळी त्यांना काही बोलेरो पिकअपमध्ये वाळू भरण्यात येत आहे असे दिसले. शुक्रवारी सकाळी ७ वा. च्या सुमारास रेमंड हाऊसच्या मागील बाजूला हा प्रकार चालू होता. २ सफेद रंगाच्या बोलेरो पिकअप आणि एक लाल रंगाचा ट्रक मिरकरवाड्याच्या दिशेने उभा होता.
राजरोस समुद्राची वाळू भरली जाते आहे हे पाहून गेडाम यांच्यातील शासकीय अधिकारी जागृत झाला आणि त्यांनी समुद्राचे चित्रीकरण सुरू केले. हे चित्रीकरण सुरू असतानाच बोलेरोमध्ये वाळू भरणाऱ्या गाडीतील एक इसम त्यांच्या दिशेने धावून आला. तुम्ही आमच्या गाड्यांचे फोटो का काढताय? असा सवाल त्याने केला. यावेळी गेडाम यांनी मी समुद्राचे चित्रीकरण करते आहे. तुमच्या गाड्यांचे चित्रीकरण केलेले नाही, असे सांगितले आणि रेमंड रेस्ट हाऊसच्या दिशेने चालू लागल्या. त्यातच त्यांना तिसरी सफेद रंगाची बोलेरो पिकअप गाडी आपल्या जवळ येऊन थांबल्याचे जाणवले आणि त्या सतर्क झाल्या.
या गाडीतून दोघेजण खाली उतरले. त्यांनी म्हटले की, तुम्ही आमच्या वाळू भरलेल्या गाड्यांचे फोटो काढले आहेत.. चित्रीकरण केले आहे. तुमचा मोबाईल माझ्याजवळ द्या, असे म्हणत त्यांनी मोबाईलही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. सारा प्रकार पाहून आपण दोन पावले मागे येत उजव्या पायाची कीक त्या माणसाच्या थोबाडावर मारली आणि तो खाली पडला. आपण कराटेचे शिक्षण घेतल्याने बाका प्रसंग टळला असे त्यांनी सांगितले. एका व्यक्तीला खाली पाडल्यानंतर दुसरी व्यक्तीही गाडीतील फावडे घेऊन माझ्या अंगावर धावून आला. मी थोडे बाजूला झाले आणि तो पुढे गेलाः मी त्याला पाठीमागून कराटे कीक मारली तसा तोही पडला. हा राडा पाहून किनाऱ्यावर उभे असलेले पिकअप गाड्यांमधील काही इसम रेस्ट हाऊसच्या दिशेने धावत आले. त्याचवेळी आपण रेस्ट हाऊस येथून निघून गेले आणि पोलीस स्टेशन गाठले असे गेडाम यांनी सांगितले.
दरम्यान, उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी भा.दं.वि.क. ३५२, ३४ अन्वये २ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहेत. पांढऱ्या समुद्रकिनारी खुल्याआमपणे वाळू उत्खनन करून चोरी तर होत आहे. परंतु आता उपजिल्हाधिकाऱ्यांसारख्या मोठ्या पदावरील व्यक्तींवर आणि तेही महिला अधिकाऱ्यावर हल्ले होत असल्याने हा सर्व प्रकार महसूल यंत्रणेने गांभीर्याने घ्याव, अशी मागणी जनता जनार्दनातून करण्यात येत आहे.