28.4 C
Ratnagiri
Friday, October 25, 2024
HomeKhedऐन पावसाच्या तोंडावर परशुराममधील २२ घरांना स्थलांतराची नोटीस

ऐन पावसाच्या तोंडावर परशुराममधील २२ घरांना स्थलांतराची नोटीस

परशुराम ग्रामस्थांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला पावसाळ्याच्या तोंडावर जाग आली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात परशुराम घाटात डोंगर कटाईमुळे धोका निर्माण झाल्याने सुरक्षेबाबत उपाय योजना करा म्हणून गेल्या ३ वर्षांपासून टाहो फोडत असलेल्या परशुराम ग्रामस्थांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला पावसाळ्याच्या तोंडावर जाग आली आहे. तहसील कार्यालयाने डोंगर माथ्यावरील २२ घरांना बुधवारपासून स्थलांतराच्या नोटीस देण्यास सुरूवात केली आहे. मात्र स्थलांतर करताना जायचे कोठे, याचा उल्लेख नसल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. गेल्या ४ वर्षांपासून परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. साधारण ३ कि.मी. लांबीच्या या घाटात करण्यात आलेल्या डोंगर कटाईमुळे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पेढे व माथ्यावरील परशुराम गावातील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे.

डोंगर कटाईवेळी दुर्घटना घडल्या. त्याचबरोबर पावसाळ्यात डोंगर खचल्याने अनेकवेळा वाहतुकीसाठी घाट बंद केला गेला. घाटातील डोंगर खोदल्याने जमीन सैल झाली आहे. गेल्यावर्षी अनेकवेळा येथे दरडी कोसळल्या होत्या. एका बाजूला परशुरामच्या घरांना धोका आहे, तर दुसऱ्या बाजूला दरीत असलेल्या पेढेतील घरांना धोका आहे. यापूर्वी येथे अपघात झाले आहेत. गेल्या ४ वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ उपाय योजना करण्यासाठी शासन दरबारी धडपडत असताना त्याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन पावसाळा सुरू झाला की चटकन जोगे होताना दिसत आहे.

परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्णत्वास गेले आहे. ठिकठिकाणी संरक्षक भिंती बांधल्या गेल्या असून काही ठिकाणी अजून काम शिल्लक आहे. पावसाळ्यात येथे दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याने तेथील भय आजही कायम आहे. आता पावसाळा सुरू होत असतानांच नेहमीप्रमाणे तहसील कार्यालयाने पशुराम येथील २२ ग्रामस्थांना स्थलांतराची नोटीस बजावली आहे. महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी कोणतीही उपाय योजना न करता केवळ नोटीस देऊन शासन आपली जबाबदारी झटकत असल्याने संतप्त झालेल्या काही नागरिकांनी बजावलेल्या नोटीस न स्वीकारता परत पाठवल्या आहेत.

स्थलांतराच्या सूचना, पण जायचं कुठे? आपला भाग डोंगरालगत असून या भागात दरड कोसळून जीवित व वित्तहानी होण्याचा शक्यता नाकारता येत नाही. तसेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था यांनी केलेल्या सर्वे क्षणानंतर अतिवृष्टी काळात संबंधित गावांचे तात्पुरते स्वरूपात स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हवामान खात्यांकडून अलर्ट संदेश मिळाल्यानंतर कुटुंबासह त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे नोटीसमध्ये बजावण्यात आले. पावसाळ्याच्या स्थितीत आम्ही नेमके जायचे कुठे, याचा उल्लेख नसल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular