संजय राऊतांच्या घरावर पडलेल्या ईडीच्या धाडीमध्ये सापडलेल्या लाखो रुपयांच्या रोख रकमेपैकी १० लाख रुपयांच्या एका बंडलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आढळून आल्याचे त्यांच्या भावाने सांगितले आहे. यादरम्यान, मुख्यमंत्री शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असताना, पत्रकारांनी राऊत यांच्या घरी सापडलेल्या १० लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे नाव असल्याबाबत प्रश्न विचारले.
मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, छापेमारीच्या काळात संजय राऊत यांच्या घरातून ११ लाख ५५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. यातील दहा लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे लिहिले असल्याचे आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
१ जुलै रोजी राऊत ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यावेळी त्यांची सलग दहा तास चौकशी करण्यात आली होती. १९ जुलै रोजी ईडीने राऊत यांना दुसरे समन्स जारी केले होते. मात्र संसदेचे अधिवेशन असल्यामुळे उपस्थित राहणे शक्य नसल्याचे कारण देत, ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती त्यांनी केली होती. मात्र, ही विनंती ईडीमार्फत फेटाळण्यात आली. २७ जुलै रोजी राऊत यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी तिसरे समन्स जारी केले होते. या चौकशीला राऊत अनुपस्थित राहिले असता, ३१ जुलै रोजी सकाळी सात वाजताच ईडीने राऊत यांच्या घरावर धाडसत्र सुरू केले. मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली.
संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या रकमेच्या बंडलावर माझे नाव होते याबद्दल मला काहीच माहिती नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारणा करण्यात आली असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले कि, माझ्याकडे चौकशी करण्यापेक्षी ज्याच्या घरात ते सापडले आहेत त्यांच्याच घरी चौकशी करा, तिथे तुम्हाला उत्तर मिळेल. संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या रकमेवर माझे नाव असेल तर ते राऊतांनाच विचारा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

