सरपंच व उपसरपंचांना लाच घेताना पकडले

807
Sarpanch and deputy sarpanch were caught taking bribe

पाखांडीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना संगमेश्वर तालुक्यातील राजीवली ग्रामपंचायतीच्या सरपंचासह उपसरपंचाला रत्नागिरीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले, अशी माहिती या खात्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली. गुरूवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. एकाच ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचांना एकाचवेळी लाच घेताना रंगेहाथ पकडण्याची कदाचित ही राज्यातील पहिलीच वेळ असावी अशी चर्चा सुरू आहे.या कारवाईत सरपंचासह उपसरपंचाला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाच्या पथकाने याविषयी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांच्या मित्राने ग्रामपंचायतीचे अखत्यारीतील पाखाडी तयार करण्याचे काम त्यांनी केले होते. तक्रारदार यांनी यापूर्वी केलेल्या कामांचे बिल मंजूर करण्याचा मोबदला व सध्या पूर्ण झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्याचा मोबदला म्हणून प्रशांत शिर्के, सरपंच, ग्रामपंचायत राजीवली व सचिन पाटोळे, उपसरपंच ग्रामपंचायत राजीवली, तालुका संगमेश्वर यांनी तक्रारदार यांचेकडे ४० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३० हजार रुपये घेण्याचे निश्चित झाले. याबाबतची रितसर फिर्याद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला.

ठरल्याप्रमाणे ३० हजार रुपयांची लाचेची मागणी करून मागणी केलेली लाच रक्कमेपैकी १५ हजार रुपये सरपंच प्रशांत शिर्के यांनी व १५ हजार रुपये उपसरपंच सचिन पाटोळे यांना स्वीकारताना गुरुवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनंत ‘कांबळे, पोलीस निरीक्षक प्रवीण ताटे, सपोफौ संदीप ओगले, पोहवा विशाल नलावडे, पोहवा श्रेया विचारे, पोना दीपक आंबेकर, पोशि राजेश गावकर व चापोना प्रशांत कांबळे यांनी केली. पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले.