परशुराम घाट वाहतुकीसाठी २४ तास खुला

195
Parashuram Ghat

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गुरुवारी ११ मे पासून मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाट २४ तास वाहतुकीसाठी खुला झाला आहे. २५ एप्रिल २०२३ पासून परशुराम घाटातील वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. आता मात्र हा घाट वाहतुकीसाठी २४ तास खुला पर्यायी वाहतूक कळंबस्ते-आंबडस- चीरणी मार्गे वळवण्यात आली होती. या कालावधीत येथून सुटणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या सुमारे शंभरहून अधिक बसेसवर याचा परिणाम झाला होता. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणनजीकच्या परशुराम घाटाचं चौपदरीकरणाचं काम गेली दोन वर्ष युद्ध पातळीवर सुरू आहे. मागील १५ दिवस घाटातील महामार्गाचे रुंदीकरणासाठी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या १६ दिवसात ठेकेदाराकडून फक्त ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे.पावसाळ्याआधी घाटातील रुंदीकरण पूर्ण करायचं होतं. पण हे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी ही पावसाळ्यात अर्धवट स्थितीत असलेला घाट प्रवाशांसाठी त्रासदायक ठरु शकतो.

महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण टप्प्यातील परशराम घाट हा अत्यंत अवघड टप्पा आहे. एकीकडे २२ मीटर उंचीचा डोंगर उतार आहे. तर, दुसरीकडे घाटाच्या पायथ्याशी पेढेगाव वसलेले आहे. त्यामुळे येथे डोंगर खोदकामाशिवाय, अन्य कामे करणे अवघड असतानाही एक मोठे आव्हान स्वीकारण्यात आले. वर्षभरापूर्वी याच घाटात डोंगर फोडत असताना पोकलेन दरडीखाली सापडली. या अपघातात एका चालकाचा मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर वेळोवेळी खबरदारी घेऊन काम सुरू ठेवण्यात आले. सर्वप्रथम पायतालगत असलेले गाव सुरक्षित करण्यासाठी उताराच्या बाजूने संरक्षण भिंत उभारण्यात आली. पहिल्या टप्प्यातील ४५० मीटर लांबीची आणि दुसऱ्या सुमारे दहा मीटर उंचीच्या संरक्षित भिंतीचे काम पूर्ण केले. या भिंतीमुळे डोंगराच्या खालील रस्ता सुरक्षित झाला. मात्र आता घाटात अतिशय धोकादायक टप्पा मानला जाणाऱ्या दरडीच्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारली जात आहे.