जिल्ह्यातील ८५ वाड्या तहानलेल्या – टंचाईची तीव्रता वाढली

53
The severity of the shortage increased

जिल्ह्यात ४२ गावांतील ८५ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून आतापर्यंत १७ हजार ४५ लोकांनी याचा लाभ घेतला आहे. उन्हाची तीव्रता मागील आठवड्यात अधिक जाणवत असल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रतेत वाढ झाली आहे. प्रशासनाकडून पाण्याचा स्वापर काळजीपूर्वक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुहागर, संगमेश्वर आणि राजापूर तालुके वगळता अन्य सहा तालुक्यांमधील टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यावर भर दिला गेल्यामुळे या वर्षी टंचाईतील गावांमध्ये घट होत आहे. या वर्षीचा टंचाई आराखडाही कमी करण्यात आला आहे. टँकरवरील खर्चात भविष्यात मोठी कपात अपेक्षित आहे. यंदा मार्चच्या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली. गावाच्या एका बाजूला डोंगरात वसलेल्या गावांमध्ये टंचाईची परिस्थिती जाणवत अहे. सर्वाधिक टँकरची मागणी खेड तालुक्यातून आहे.

उन्हाचा कडाका आणखीन काही दिवस राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर थोडावेळ हवेत गारवा होता; परंतु दुपारनंतर उष्मा जाणवू लागला. वाढत्या उन्हामुळे पाणीपातळीत घट होत असून, अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे.जिल्ह्यातील लघुपाटबंधाऱ्यामध्ये ३५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. याचा विचार करताना नदीकिनारी भागातील विहिरींचे पाणीही कमी होणार आहे. या वर्षी पाऊस उशिराने सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसे झाले तर मे महिन्याच्या अखेरीस टँकरची संख्येत मोठी वाढ होऊ शकते.