चिपळूण शहर व परिसरातील तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. तरुणांना सहजरित्या अमली पदार्थ उपलब्ध होत आहेत. त्यामुळे अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन चिपळूण सिटिझन मुव्हमेंट आणि जागरूक नागरिकांच्यावतीने बुधवारी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र राजमाने यांना देण्यात आले. या वेळी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. मागील आठवड्यात चिपळूण शहर परिसरात गांजा या मादक पदार्थांचे सेवन करणारे तीन-चार तरुण एका इमारतीमध्ये आढळून आले. पूर्वीपासूनच मादक पदार्थ व्यसन करणाऱ्यांची टोळकी आढळून येत असल्याची खुलेआम चर्चा सुरू होती; मात्र, पोलिसांकडून प्रत्यक्षात कारवाई होत नव्हती.
अखेर काही जागरूक नागरिकांनी संबंधित संशयितांना एका इमारतीत गांजा सेवन करताना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवल्याने हळूहळू आता गांजा विक्री व सेवन करणाऱ्यांची यादी वाढत आहे. अमली पदार्थांचे अड्डे शहरात अनेक ठिकाणी तयार झाले आहेत. याच्या आहारी शाळेतील विद्यार्थीही जाण्याचे धोके वाढले आहेत. त्याचे दुष्परिणाम त्यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबावर होऊ लागले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी. त्यासाठी अमली पदार्थाचे रॅकेट दलाल व जे अटक आहेत त्यांना जामीन मिळणार नाही यासाठी पोलिसांनी योग्य कार्यवाही करावी. अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलांवर गुन्हे दाखल न करता त्यांचे समुपदेशन करावे.
सीसीटीव्ही बंधनकारक करावा – शहरातील सर्व पानटपऱ्या, पानविक्रेते यांना सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करावे. गुटख्यासारखे अंमली पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करून त्याचा व्यवसाय परवाना रद्द करावा. विशेष पोलिस पथक स्थापन करावे. त्यांची गस्त शहर परिसरात ठेवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.