रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा ऑनलाईन फसवणुकीच्या घटना डोके वर काढू लागल्या आहेत. बँक आणि पोलीस यंत्रणेकडून वारंवार जागरुकता केली जात असून देखील अनेक वेळा ऑनलाईन व्यवहारांमध्ये फसवणूक केल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना सावर्डे चिपळूण येथे घडली असून, वडील आणि मुलीच्या खात्यातील रक्कम अज्ञाताने लांबवली असून पोलीस त्याचा तपास घेत आहेत.
वडिलांच्या आणि मुलीच्या बँक खात्यातील २ लाख ६३ हजार ८७० रुपये इतकी रक्कम पिन कोड हॅक करून ऑनलाईन काढून फसवणूक केल्याची घटना सावर्डे येथे घडली. या प्रकरणी शरद गंगाराम शिवडे वय ५२, रा. डेरवण यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.
शिवडे यांचा मोबाईल बँक खात्याला लिंक केला आहे. तसेच शिवडे यांची मुलगी साक्षी हिचेही वडिलांच्या बँकेत बचत खाते असून त्यास दुसरा एक मोबाईल लिंक करण्यात आला आहे. २१ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत अज्ञाताने शिवडे व त्यांची मुलगी यांच्या बँक खात्यांचे पासवर्ड व गोपनीय पिनकोड हॅक करून ऑनलाईन व्यवहाराद्वारे दोन्ही बँक खात्यातील २ लाख ६३ हजार ८७० रुपये इतकी रक्कम काढून फसवणूक केली.
खात्यातील पैसे गेल्याचा प्रकार शिवडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात धाव घेतली आणि अज्ञात गुन्हेगाराबाबत फिर्याद दाखल केली. त्याअंतर्गत अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची सायबर यंत्रणा या सर्व ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणाचा छडा लावत अज्ञात गुन्हेगाराचा शोध घेत आहे.