चिपळूण शहरातील नागरिकरण दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेने पिण्यासाठी लागणारे पाणी मर्यादित उपलब्ध होत आहे. कुठे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे तर कुठे मचूळ पाण्याचा प्रश्न आहे; पण शहरात पाण्याच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नासाडीचा मोठा प्रश्न आहे. अवैध पाणी जोडणीचे प्रकार, इमारतींमध्ये वाया जाणारे पाणी, शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे त्यांना देण्यात आलेले कनेक्शन यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहिली आहे. गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाण्याचा गैरवापर झाल्यास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून सभासदांवर दंड लावला जातो किंवा त्यांना ताकीद दिली जाते.
त्यामुळे सोसायटीमध्ये पाण्याचा फार गैरवापर होत नाही; मात्र ज्या भागातील अपार्टमेंटला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो तेथे घरगुती नळाला पंप लावून घरात पाणीसाठा केला जातो. बंगले आणि घरांमध्ये राहणारे काही लोक पिण्याच्या पाण्याचा वापर गार्डनसाठी आणि वाहने धुण्यासाठी करतात. घराच्या भिंतीवर साचलेली धूळ काढण्यासाठी पिण्याचे पाणी वापरले जाते.
नळाला चक्क पंप लावून अतिरिक्त पाणी ओढले जाते. उन्हाळ्यात घरासमोरची जमीन ओली राहावी यासाठी पिण्याचे पाणी जमीन ओली करण्याकरिता वापरले जाते. शहरातील विकासकामे करण्यासाठी पालिकेकडून ठेकेदार नियुक्त केले जातात. त्यांनी नागरी कामे करताना बाहेरून पाणी आणणे अत्यावश्यक आहे; मात्र अनेकजण विनापरवाना अनधिकृत कनेक्शन घेऊन पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी वापर करतात.