आज कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक लोकाना आपल्या नोकरी धंद्यावर पाणी सोडायला लागले. उद्योग धंदे ठप्प झाल्याने अनेक लोक बेरोजगार झालीत, अगदी काही जणांवर उपासमारीची सुद्धा वेळ आली. कोरोनामुळे अशा प्रकारचे दिवस बघायला लागतील अशी पुसटशी कल्पनाही नव्हती.
रत्नागिरीमधील अनेक जणांच्या नोकर्या या कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या. काही जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. काम धंदा जरी बंद असला तरी मुलांची शिक्षण, कुटुंबाचा खर्च, विजेची बिल, बँकेचे हफ्ते या गोष्टी मात्र वेळेवरचं भराव्या लागतात. यामध्ये शासनाने काही प्रमाणात सूट दिली असली तरी, जर नोकरीच नसेल आणि जी काही जमापुंजी असेल ती खर्च झाली तर हे खर्च तरी कसे निभावणार! असे अनेक प्रश्न पालकांसमोर उभे राहिले आहेत.
चिपळूण मधील काही शिक्षण संस्था फि भरण्यासाठी पालकांच्या मागे तगादा लावून आहेत. वर्षभर जरी ऑनलाईन शाळा असली तरी शिक्षण संस्थ्येकडून फि मध्ये काहीच सवलत न देता, संपूर्ण फि भरण्यासाठी आग्रह केला जात आहे. जे सद्य स्थितीमध्ये शक्य नसल्याने पालकांनी कोरोनाची परिस्थिती डोळ्यासमोर असूनसुद्धा, शिक्षण संस्थांच्या अशा हटवादी धोरणावर आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसकडे मदत मागितली आहे. त्यावेळी परिस्थितीची समज देऊन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने त्या त्या संस्थांना दिली. परंतु कालांतराने पुन्हा फि भरण्यासाठी शिक्षण संस्थांचे पालकाना वेठीस धरणे सुरूच असल्याचे दिसून आले.
कोरोनाच्या या महामारीमध्ये विद्यार्थी आणि पालकांची होणारी ही पिळवणूक सहन केली जाणार नाही. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आरेकर यांनी जर शिक्षण संस्थांनी विद्यार्थी आणि पालकवर्गाला वेठीस धरणे सोडले नाही तर, या मुजोरी शिक्षण संस्थांविरोधात राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.