कोरोनाची पहिली लाट येऊन गेली, आता दुसरी लाट सुरु आहे आणि तिसर्या लाटेची येण्याची पण शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या आणि दुसर्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू ओढवले असून, अचानक आलेल्या या कोरोनाच्या संकटामुळे सर्व जनता हवालदिल झाली आहे. तिसर्या लाटेचा जास्तीत जास्त प्रभाव लहान मुलांवर होणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शासनाने काही गोष्टींचे पूर्वनियोजन केले आहे.
महाराष्ट्र सरकारने तिसर्या लाटेसाठी पूर्वनियोजन म्हणून एक टास्कफोर्स तयार करण्याचे ठरविले आहे. या टास्कफोर्समध्ये चिपळूण मधील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. समीर दलवाई यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. दलवाई यांचे नाव वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या आदराने आणि अदबीने घेतले जाते. केवळ मुलांच्या शारिरीक व्याधींवरचं उपचार न करता, मुलांचे मानसिक स्वास्थ सुधारण्याकडे, त्याचप्रमाणे मुलांचा सर्व बाबतीत विकास घडवण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. लहान मुलांच्या संदर्भातील वेगवेगळ्या आजारांवर संशोधन करून त्यावर योग्य आणि कमी खर्चिक अशी उपचार पद्धती निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
मुंबई मधील न्यू होरीझोन चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटर या त्यांच्या हॉस्पिटलला उत्कृष्ट कामकाजामुळे कमी वेळेमध्येच प्रसिध्दी प्राप्त झाली. तेथे लहान मुलांच्या संदर्भातील सर्व आजारांचे निर्मुलन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे केले जाते. तसेच वेगवेगळ्या संशोधनासाठी त्यांची नियुक्ती केली जाते. लहान मुलांसाठीच्या विविध चर्चासत्रांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो.
महाराष्ट्र शासनाने तिसर्या लाटेला पूर्वनियोजित रोख बसण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नियोजनाखाली १० सदस्यांची टास्कफोर्स स्थापन केली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून डॉ. दलवाई यांची १० जणांमध्ये निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.