रत्नागिरी जिल्हयातील मागील वर्षभरापासून सतत चर्चेत असलेले मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील सी काँच रिसॉर्ट आज मंगळवार दि. २२ नोव्हेंबर रोजी पाडण्यात येणार आहे. प्रशासनाकडून पाडण्याच्या कामाची तयारी सुरू असून कायद सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने देखील तयारी पूर्ण झाल्यावर दिवसभरात कोणत्याही क्षणी रिसॉर्टवर हातोडा पडणार आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट व सी काँच रिसॉर्ट ही दोन्ही रिसॉर्ट अनिल परब यांचीच असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, साई रिसॉर्टवर तूर्तास तरी हातोडा पडणार नसून हा विषय न्याय प्रविष्ट असल्याने साई रिसॉर्टविषयी कायदेशीर बाजू तपासून पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सी काँच रिसॉर्ट पाडण्यासाठी मुंबई येथील एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यक पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम पाडण्याची मोठी कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल, बांधकाम विभागाकडून तयारी सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर साई रिसॉर्टवरही कारवाई व्हावी यासाठी किरीट सोमय्या सकाळी दहा वाजता दापोली पोलीस स्थानकाला भेट देणार आहेत. त्यामुळे या सगळ्या कारवाई प्रकरणाकडे अवघ्या राज्याच्या नजरा खिळल्या आहेत.
या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. सी काँच रिसॉर्ट हे पुष्कर मूळ्ये नामक व्यक्तीचे असून या रिसॉर्टजवळही अनिल परब यांचा संबंध असल्याच म्हटले जात आहे. दरम्यान सोमय्या यांचे हे सगळे आरोप अनिल परब यांनी फेटाळून लावले आहेत. रिसॉर्ट सीआरझेडमध्ये बांधण्याचा हा गुन्हा आहे. यामुळे हे भ्रष्टाचाराचे स्मारक तुटणार. हे दसऱ्याला तुटेल असा दावा सोमय्या यांनी केला होता. मात्र तो दावा फेल गेला आहे.
साई रिसॉर्ट शेजारी असलेल्या सी काँच रिसॉर्टच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्कर मुळ्ये यास फरार घोषित करावे अशी मागणी आपण पोलिसांकडे केली आहे. हे रिसॉर्ट बांधकामसाठी पैसे कुठून आले, याची चौकशी आयकर व ईडीद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे अखेर कारवाई कशा प्रकारे केली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.