छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी, भाजप नेते व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी निषेध करून संताप व्यक्त केला आहे. कोश्यारी म्हणाले होते कि, महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे आयकॉन मिळतील, छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातले आहेत. मी आत्ताच्या काळाबाबत बोलतो आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आयकॉन आहेत, असं कोश्यारी यांनी म्हटले होते.
यापूर्वीही त्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलही वादग्रस्त विधान केले होते. राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी झाली पाहिजे, अशी मागणीही शेकासन यांनी केली. कोश्यारी यांना मानसिक आजार जडला आहे का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांचा वारंवार तोल सुटत चालला आहे हे दुर्भाग्य आहे असेही शेकासन म्हणाले. राज्यपालांनी वादग्रस्त विधान करून जी स्थिती निर्माण केली आहे, त्याबद्दल भाजपने समोर येऊन उत्तर द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांचा देशभरात सगळीकडेच निषेध नोंदवला जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आजचे राजकीय नेते नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याशी केली आहे. याचा लांजा तालुका शिवसेनेच्या वतीने आम. राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला. या वेळी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, उपतालुकाप्रमुख सुरेश करंबेळे आदी उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद चिपळूणमध्ये देखील उमटले आहेत. विरोधी पक्ष शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे राज्यपालांना जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मराठा संघटना राज्यपालांविरुद्ध आक्रमक झाले असून राज्यपालांना दिल्लीला बोलवून घ्या अशी मागणी करण्यात येत आहे. तर, माफी मागा नाहीतर स्वत:लाच जोडे मारुन घ्या, असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.