कोकणातून जाणाऱ्या रेवस ते रेड्डी सागरी मार्गावरील प्रमुख पुलांपैकी काळबादेवी पूल सुमारे २ किमी लांबीचा आहे. आज काळबादेवीमध्ये मानवी वस्तीत सुमारे ६० फुटी रस्त्याच्या भूसंपादनाची मोजणी शासनाच्या सव्र्व्हे विभागाकडून सुरू झाली. स्थानिकांनी या मोजणीला कडाडून विरोध केला. घरे तोडून मानवी वस्तीतून हा रस्ता काढण्यापेक्षा किनारी भागातून काढावा, असे स्पष्ट करीत ग्रामस्थांनी मोजणी रोखली. याबाबत शंभर ग्रामस्थांनी सर्व्हे विभागाला पत्र दिले. जिल्ह्यातील रेवस रेड्डी सागरी महामार्गावरील काळबादेवी खाडी येथे मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी तांत्रिक निविदा उघडल्या आहेत.
रेवस ते कारंजा खाडीपुलासाठी अशोका बिल्डकॉन आणि विजय एम. मिस्त्री कन्स्ट्रक्शन या तर आगरदांडा ते दिघी खाडीपुलासाठी अशोका बिल्डकॉन, टी अँड टी इन्फ्रा, तसेच विजय एम. मिस्त्री कन्स्ट्रक्शन या कंपन्यांमध्ये चुरस आहे. सर्वात कमी बोली ‘विजय एम. मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड’ या कंपनीची असल्याने ती पात्र ठरली आहे. रत्नागिरी-काळबादेवी सागरी पुलासाठी २९१.६४ कोटी खर्च येणार आहे. काळबादेवी पूल काळबादेवी बीच आणि सड्यामिऱ्याला जोडणार आहे. सागरी महामार्गासाठी काळबादेवी गावात आज सव्र्व्हे विभागाचे अधिकारी आले होते. स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता दोन दिवसांपूर्वी स्थानिकांना भूसंपादनासाठी नोटीस आली.
वस्तीतून हा सागरी मार्ग जात असल्याने अनेकांची घरे उद्ध्वस्त होणार आहेत. ज्यांची घरे जाणार आहेत, त्यांना पर्यायी जागा देखील नाही. आमचा या विकासाला किंवा महामार्गाला विरोध नाही; परंतु आमची घरे तुटणार असतील, तर आमचा या महामार्गाला विरोध राहील. काळबादेवी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या बाजूने हा महामार्ग घ्यावा; परंतु आम्ही घरे तोडून हा मार्ग होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडत काळबादेवीवासीयांनी या सव्र्व्हेला विरोध करून काम थांबविले. तसे निवेदन देखील काळबादेवीवासीयांनी सर्व्हे विभाग, जिल्हाधिकारी, एमएमआरडीसी आदी विभागांना दिल्याची माहिती ग्रामस्थ दीपक जोशी यांनी दिली.