रोहा-दिघी ३३.७६ किमीचा ८०० कोटी गुंतवणुकीचा रेल्वेमार्ग प्रलंबित आहे. त्याला सिग्नल कधी मिळणार याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे, असे प्रतिपादन कोकणचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दिघी येथे उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पालाही मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. पाटणे बोलत होते. दिघी औद्योगिक प्रकल्पासाठी ५ हजार ४६९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. ६ हजार ५६ एकरांतील दिघी बंदर प्रकल्पातून १ लाख १४ हजार १८३ जणांना रोजगार प्राप्त होणार आहे.
केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, सरकार १२ औद्योगिक प्रकल्पांवर २८ हजार ६०२ कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे सुमारे १० लाख रोजगार निर्माण होतील. या प्रकल्पांमध्ये उत्तराखंडमधील खुरपिया, पंजाबमधील राजपुरा पटियाला, महाराष्ट्रातील दिघी, केरळमधील पलक्कड, उत्तर प्रदेशातील आग्रा आणि प्रयागराज, बिहारमधील गया इत्यादींचा समावेश आहे. औद्योगिक विकास क्षेत्र मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. कोलाड रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटर आणि इंदापूर, माणगावपासून १० किलोमीटर अंतरावर आहे. येथून मुंबड विमानतळाचे अंतर १७० किलोमीट आहे.
या प्रकल्पापासून दिघी बंद केवळ ५५ किलोमीटर अंतरावर आहे. बंदराप्रमाणे दिघी औद्योगिक क्षेत्राचे औद्योगिकीकरण करण्यात येणार असल्याची माहितीही केंद्रीय मंत्र्यांनी दिली. यामध्ये रायगड जिल्ह्यातील रोहा आणि माणगावमधील नऊ गावांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी २ हजार ३१३ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. यातील प्रकल्पांतर्गत सुमारे ४२ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. कोकण विकासाचा दिघी मार्ग प्रशस्त होईल यात शंका नाही; परंतु रोहा-दिघी रेल्वेमार्ग होणे
आवश्यक आहे, असे अॅड. पाटणे यांनी स्पष्टपणे सांगितले.