मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्ज भरण्यासाठी महिलांची तारांबळ उडाली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बँकेमध्ये खाते काढण्यासाठी महिलांची गदीं होत आहे. दुसऱ्या बाजूला अनेक गावांमध्ये मोबाईल रेंज नाही. ज्या ठिकाणी रेंज आहे त्या ठिकाणी इंटरनेटच्या अपेक्षित स्पीडची ओरड आहे तसेच सव्र्व्हर डाउन होत असल्याने अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, राजापूर तालुक्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी २४ हजार ८५५ पात्र लाभार्थी महिला आहेत.
त्यापैकी ४ हजार २८६ महिलांचे ऑफलाईन तर ८८३ ऑनलाईन अर्ज भरून झाल्याची माहिती पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली. ग्रामीण भागामध्ये पुरेशी रेंज नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. निर्धारित कालावधीमध्ये फॉर्म भरण्याचे काम कसोशीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या वेळी महिला व बालविभागाकडून स्पष्ट करण्यात आले. राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली असून, यामध्ये पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत.
या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शासनाकडून नारीशक्ती दूत अॅप तयार करण्यात आले आहे. हे अर्ज भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली असून, अंगणवाडीमधील नियमित कामाचा भार सांभाळताना नारीशक्ती दूत अॅपच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची अतिरिक्त जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागत आहे; मात्र, ग्रामीण भागामध्ये पुरेशी रेंज आणि मोबाईल नेटवर्कचा अभाव असल्याने ऑनलाईन अर्ज भरताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.