मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाजवळ बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या गटारी अनेक ठिकाणी फुटलेल्या आहेत. काही ठिकाणी रस्ता खाली व गटारींची उंची वर अशी स्थिती आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गटारीत जाणार नाही. रस्त्यावर पाणी साचून अपघाताची शक्यता आहे तसेच महामार्गालगतच्या गटारी अद्यापही जशाच्या तशाच आहेत. पावसाळ्यापूर्वी त्या साफ केल्या नाहीत, तर नागरिकांची गैरसोय होणार आहे. बहादूरशेखनाका ते ही पागनाका दरम्यान जागा पालिकेच्या हद्दीत येते. या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाने जी गटारी बांधल्या आहेत. ती निकृष्ट दर्जाची असल्यामुळे आतमध्ये कोसळून गटारीमध्येच भराव झाला आहे. त्या गटारी पावसाळ्यापूर्वी साफ कोणी करायच्या, पालिकेने की राष्ट्रीय महामार्ग विभागाने? ही जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निश्चित केली पाहिजे. चालढकल करून एकमेकांच्या खात्याकडे बोट दाखवू नये.
भविष्यात नागरिकांना त्रास होणार आहे. याबाबत शौकत मुकादम म्हणाले, पावसाचे पाणी गटारीतून जाऊच शकत नाही. संबंधित खात्यांना व अधिकाऱ्यांना हे माहिती असूनही त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. हे योग्य नाही. गटारीवर काही ठिकाणी साफ करण्यासाठी जे कप्पे बसवले आहेत त्या कप्प्यावर दोन-अडीच फुटाचा आरसीसी कप्पा उचलण्यासाठी लोखंडी हूक लावला आहे. त्या हुकामध्ये रस्त्याच्या बाजूने चालताना पाय अडकून अपघात होतो. लोखंडी हुकाची पद्धतही चुकीची असून, आरसीसी कप्पा उचलण्यासाठी आतील बाजूने खाच ठेवलेली नाही. तेथील गटारी कचऱ्याने तुडुंब भरल्यामुळे पावसाचे नैसर्गिक पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. ते मोकळे केले गेले नाहीत तर पावसाळ्यात अडचणी निर्माण होतील.