प्रत्येक गोरगरिबाला स्वतःचे घर मिळावे, यासाठी शासन घरकुल योजनेची अंमलबजावणी करते. परंतु तांत्रिक कारणास्तव घरकुलांची बिले अडकल्याने गुहागर तालुक्यातील लाभ मिळालेल्या अनेक घरकुल कुटुंबांची कामे अर्धवट राहिलेली दिसून येत आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात त्यांचा संसार उघड्यावर आलेला पहायला मिळत आहे. या योजनेतून होणाऱ्या घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थ्याला एकूण १ लाख २० हजार मंजूर आहेत. यापैकी पहिला हप्ता १५ हजाराचा असतो. हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली की मगच घरकुलाच्या कामाला सुरुवात होते. त्याप्रमाणे लाभार्थ्यांनी पहिल्या हफ्त्याचे काम करून दुसऱ्या हफ्त्याची प्रतीक्षा केली जात आहे. पुढील निधीच आला नसल्याने घरकुलांची बांधकामे रखडलेली दिसून येत आहेत. घरकुलाची कामे वेळेत होणे अपेक्षित असतात. मार्चअखेरपर्यंत या घरकुलांची कामे होणे गरजेची आहेत. लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.
मात्र पुढील निधी अद्याप शासनस्तरावरुन आलेला नसल्याने तालुका प्रशासनाला सातत्याने विचारणा लाभार्थ्यांकडून होत आहे. प्रत्येक गावांमध्ये ग्रामसभा घेऊन शासनाच्यो निकषाप्रमाणे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मात्र, पुढील निधी आला नसल्याने शासन लाभार्थ्यांची जणूकाही थट्टा करत असल्याचे त्यांच्यामधून बोलले जात आहे. यावर्षी घरकुलांच्या बांधकामांना शासनाच्या कुचकामी वाळू धोरणाचाही मोठा फटका बसला आहे. मोफत वाळूचे आश्वासन शासनाने दिले होते माल अधिकृत वाळू उपशालाच परवानगी नसल्याने वाळू उपलब्ध करणार कुठून हाही एक प्रश्न उभा आहे. त्यामुळे घरकुलांची बांधकामे रखडण्यास वाळू न मिळणे एक कारण पुढे आले आहे. शासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास वाळू देण्याचे आश्वासन दिले होते मात्र, अधिकृत वाळू उपसाच सुरु नसल्याने लाभार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एकीकडे शासनाकडून जाहीर करायचे दुसरीकडे लाभार्थ्यांची कोंडी करायची हा एकप्रकारे लाभार्थ्यांचा छळ सुरू आहे. अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त आहेत.