वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टने आयोजित केलेल्या कृषी व पशुधन महोत्सवाचे उदघाटन करण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी चिपळूणमध्ये येत आहेत. त्यांच्या स्वागताची व कृषी महोत्सवाची जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. सलग दुसऱ्यावर्षी देखील कृषी व पशुधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ५ जानेवारी ते ९ जानेवारी पर्यंत हा महोत्सव चिपळूण बहादूरशेख येथील वीर सावरकर मैदानावर रंगणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी खा. शरद पवार यांचे रविवारी सकाळी १० वाजता चिपळूण शहरातील पवन तलाव मैदानावरील हेलिपॅडवर आगमन होणार असून राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्व नेते त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
वाशिष्ठी डेअरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्यांच्या स्वागताची जय्यत अशी तयारी देखील करण्यात आली आहे. कृषी महोत्सवाच्या ठिकाणी मोठी स्वागत कमानी उभारण्यात आली असून चिपळूण शहरात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर व झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता खा. शरद पवार यांच्या हस्ते कृषी व पशुधन महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. त्यानंतर खा. शरद पवार संपूर्ण महोत्सवाची पाहणी करणार आहेत. यावेळी राज्यभरातून आलेले पशुधन व शेतकऱ्यांशी देखील खा. शरद पवार संवाद साधणार असून महोत्सवाला मार्गदर्शन करणार आहेत.
वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन – विशेष म्हणजेच रविवार दिनांक ५ जानेवारी रोजी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांचा ५०वा वाढदिवस साजरा होत असल्याने पक्षाचे सुप्रीमो खा. शरद पवार यांच्या हस्ते त्यांचे अभिष्टचिंतन केले जाणार आहे. प्रशांत यादव यांनी नुकतीच विधानसभेची निवडणूक लढवली, त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी तब्बल ९० हजार मते मिळवली होती. यासंदर्भात खा. शरद पवार काय बोलणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महोत्सवात अनेक आकर्षण – या महोत्सवात महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील कलाकार प्रसाद खांडेकर व नम्रता संभेराव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महोत्सवात हुबेहूब पुरातन कोकण उभे करण्यात आले आहे.