महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पमक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होणार असून त्याच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार मंगळवारी किंवा बुधवारी दोन्ही नेते एकत्रित पत्रकार परिषद घेवून युतीची घोषणा करतील. दरम्यान त्या आधी सोमवारी दिवसभर अनेक घडामोडी घडल्या. दरम्यान या युतीच्या जागावाटपाबाबत राज ठाकरेंनी फार रस्सीखेच करू नका असे सांगत एका वाक्यात विषय संपविला आहे. मुंबई महानगरपालिकेबरोबरच अन्य काही महापालिकांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र निवडणूक लढणार आहे. मागील काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंची जवळीक वाढली असून युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. काही जागांवरुन दोन्ही सेनांमध्ये रस्सीखेच सुरु असतानाच आता जागावाटपावर थेट राज ठाकरेंनीच एक महत्त्वाची सूचना केल्याची माहिती समोर येत आहे.
बैठकांचं सत्र – ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनच्या युतीबाबत पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये चर्चा झाली. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. जवळपास ४० ते ४५ मिनिटे दोन्ही पक्षाच्या नेत्यांदरम्यान चर्चा झाली. शिवसेना आणि मनसे युतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असल्याची माहिती राऊत यांनी या भेटीनंतर दिली. जागा वाटपाच्या चर्चे साठी पुन्हा दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. दरम्यान, रविवारी एकीकडे राज्यभरातील नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच मुंबईत राऊत आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर बाळा नांदगावकरांसोबतही राऊत आणि राज यांनी चर्चा केली. या भेटीदरम्यान युतीसंदर्भात पुढील पक्ष धोरण कसं असेल याबद्दल सकारात्मक चर्चा झाली.
राज ठाकरेंकडून सूचना – या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी जागावाटपावरुन दोन्ही सेनांच्या नेत्यांना एक अत्यंत महत्त्वाची सूचना केली. जागावाटपाची फार रस्सीखेच करू नये, अशी सूचना राज यांनी दोन्ही नेत्यांना (राऊत आणि नांदगावकर यांना) दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरेंची ही सूचना दोन्ही नेत्यांना पटली असून युतीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असून दोन्ही पक्षांमधील जागावाटपाच्या चर्चे चा विषय बऱ्याच अंशी संपल्याचं सांगितलं जात आहे.
युती नाही प्रीतिसंगम – सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधता संजय राऊत यांनौ, दोन भावांची युती झाली आहे, असं म्हटलं. तसेच, राजकीय युतीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. २३ तारखेपासून अर्ज भरण्याची मुदत सुरू होत आहे. त्यामुळे त्या अगोदर घोषणा केली जाईल, असं राऊत यांनी सांगितलं. ठाकरे बंधुंच्या युतीबद्दल बोलताना, हा एक नवीन प्रयोग आहे. हे नाटक नाहीये. हा प्रीतिसंगम आहे महाराष्ट्रातील जनतेचा प्रीतिसंगम आहे, असं राऊत म्हणाले.
आज-उदया युतीची घोषणा ? – ठाकरे बंधुंच्या युतीची मंगळवारी (२३ डिसेंबर रोजी) घोषणा होणार असल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही ठाकरे बंधू संयुक्त पत्रकार परिषद घेवून घोषणा करणार असल्याचं समजतं. कदाचित मंगळवार ऐवजी बुधवारी घोषणा होवू शकते.

