संगमेश्वर- चिपळूण विधानसभा मतदारसंघात संगमेश्वर तालुक्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी संगमेश्वर तालुक्यातील उबाठा गटाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ठाकरे शिवसेनेला डावलले जात असून, विधानसभा निवडणुकीसाठी संगमेश्वर तालुक्यातील उमेदवार न दिल्यास उबाठा गट संपण्याची भीती आणि शिवसैनिकांचा उद्रेक होण्याची शक्यता पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, सर्वसामान्य शिवसैनिक यांनी व्यक्त केली आहे. संगमेश्वर तालुका शिवसेनेच्या वतीने (उबाठा गट) आरवली व देवरूख येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
या वेळी संतोष थेराडे, सुभाष नलावडे, बंड्या बोरूकर, दिलीप सावंत, अरविंद जाधव, विजय कुवळेकर, अनंत गुरव, विष्णू विंजले, जगन्नाथ राऊत, किशोर जाधव, शशिकांत धामणस्कर, नीलेश भुवड, रामचंद्र हरेकर, चंद्रकांत जाधव, सुनील कातकर, प्रकाश घाणेकर, महेंद्र सुर्वे, प्रशांत विचारे, अनंत उजगावकर आदी उपस्थित होते. संतोष थेराडे म्हणाले, संगमेश्वर तालुक्याला उमेदवारीसाठी गेली अनेक वर्षे डावलले जात आहे. संगमेश्वर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. संगमेश्वर तालुक्यात सुभाष बने, रवींद्र माने, राजेंद्र महाडिक यांच्यासारखे नेतृत्व आहे. त्यामुळे या बालेकिल्ल्यातून शिवसेनेला उमेदवारी देण्यात यावी.
संगमेश्वर तालुक्याचा आमदार असावा, अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची मागणी आहे. उमेदवारीसाठी संगमेश्वर तालुक्याला डावलले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटातील निष्ठावंत शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची घुसमट होत असून, त्यांच्या मनात चीड आहे. उमेदवारी न दिल्यास शिवसेनेतून वेगळा उद्रेक पाहायला मिळेल. शिवसेनेची ताकद असतानाही डावलले जात आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मित्रपक्ष मोट बांधणी करत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. सुभाष नलावडे म्हणाले, संगमेश्वर तालुक्याला कोणीच वाली नाही. आतापर्यंत संगमेश्वर तालुक्यानेच उमेदवाराला २० हजारांचे मताधिक्य दिले असल्याची सांगितले. मित्रपक्षातून आपल्याला डावलले जात आहे.