मंगेश काळोखे हे शुक्रवारी संकाळी ७ वा.च्या सुमारास त्यांच्या मुलींना शाळेत सोडण्यासाठी मागणी मोटरसायकलवरून गेले होते. मुलींना शाळेत अचानक सोडून परतत असताना काळया रंगाच्या गाडीतून ४ मारेकरी आले आणि त्यांनी मंगेश काळोखे यांना पकडून तलवारी आणि चॉपर, कुऱ्हाडीच्या सहाय्याने त्यांच्यावर सपासप वार केले. मंगेश काळोखे रस्त्यावरच रक्ताच्या थारोळयात कोसळले.
सकाळची वेळ – सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे मंगेश काळोंखेंवर झालेल्या हल्ल्यानंतर बराचवेळ त्यांच्या म दतीसाठी कोणीही येवू शकले नसावे. काही वेळ गेल्यानंतर त्या रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांना रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले मंगेश काळोखे दिसले. त्यानंतर त्यांनी झटपट सुत्रे हलविली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
खोपोली हादरली! – काही वेळातच या खुनाची बातमी खोपोलीत वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी घटनास्थळी तर काहीजणांनी रूग्णालयात धाव घेतली. रुग्णालाबाहेर महिलांची मोठी गर्दी झाली होती. नातेवाईकांना बोलावण्यात आले. तेव्हा त्यांनी आरोपींना अटक होईस्तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमीका घेतली. शुक्रवारी दिवसभर खोपोली. पोलिस स्थानकाबाहेर महिलांची मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले.
खोपोली बंद – या खुनानंतर शुक्रवारी दिवसभर खोपोलीत संताप व्यक्त होत होता. खोपोली शहरात बंद पाळण्यात आला. आरोपींना तत्काळ अटक करा अशी मागणी करत पोलिस स्थानकासमोर दिवसभर शिवसेनेच्या महिलांनी जणू ठिय्या आंदोलन केले.
गाजलेली निवडणूक – खोपोली नगरपरिषदेची नुकतीच झालेली निवडणूक गाजली होती. या निवडणुकीत नुकत्याच झालेल्या प्रभाग २ मधून मानसी मंगेश काळोखे या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून विक्रमी मतांनी निवडून आल्या आहेत. निवडणूक काळात याच प्रभागात किरकोळ वाद झाल्याची घटना घडली होती. या वादावर त्यावेळेस पडदाही पडला होता, मात्र हा वाद पुन्हा उफाळून आला आणि काळोखे यांची हत्या घडल्याचे बोलले जात आहे.
पोलिस दाखल – खोपोली शहरात तणावपूर्ण वातवरण पसरल्याने पोलीस अधिक्षक आंचल दलाल, सहाय्यक अधीक्षक रायगड अभिजित शिवथरे, गुप्तहेर खात्याची जिल्हा निरीक्षक मिलिंद खोपडे पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्या आदेशानुसार खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असून तपास यंत्रणेसाठी फ़ॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
कुऱ्हाडीने वार – मृत मंगेश काळोखे यांचे पुतणे राज काळोखे यांनी खुनाविषयी रितसर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार मंगेश काळोखे हे आपल्या मुलींना शिशु मंदिर स्कूल येथे सोडून परत येत होते. सकाळी ०७.०० वा. च्या सुमारास ते जया बार समोरील चौकात, विहारी, खोपोली येथे आले असता त्याचवेळी आरोपी दर्शन रविंद्र देवकर, सचिन संदिप चव्हाण व इतर ३ इसम ांनी मंगेश काळोखे उर्फ आप्पा यांचा पाठलाग केला. त्यांना जमीनीवर खाली पाडले. त्यानंतर त्यांच्यावर तलवार, कोयता व कुऱ्हाडीने वार करुन जीवे ठार मारले आहे असे फिर्यादीमध्ये नमुद केले आहे.
अनेक आरोपी – मृत मंगेश काळोखे यांचे पुतणे राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ७ आरोंपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील काही आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाचे कार्यकर्ते असल्याने ही हत्या राजकीय सूडातुन झाल्याचा आरोप होतो आहे. पोलिसांनी शस्त्र अधिनियम कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे, मात्र आरोपींना अजुनही अटक झालेली नाही.

