एटीएसने अटक केलेल्या चार दहशतवाद्यांच्या झालेल्या चौकशीतून देशभरातील बॉम्बस्फोटाचा संपूर्ण कट उघडकीस आला आहे. त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आल्याने अधिक चौकशीत आणखी काही माहिती हाती येण्याची शक्यता आहे. चौघांपैकी एका दहशतवाद्याला रत्नागिरीतून अटक करण्यात आले होते. घातपात प्रकरणी एटीएसने चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांची पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपुष्टात आल्यावर त्यांना विशेष अतिरिक्त न्यायाधीश व्ही आर कचरे यांच्या न्यायालयात दहशतवाद विरोधी पथकाकडून हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने संबंधित चार आरोपींच्या पोलीस कोठडीत ११ ऑगस्ट पर्यंत वाढ केली आहे.
यावेळी एटीएस अधिकाऱ्यांनी चार दहशतवाद्यांच्या चौकशीत ते इसिस आणि अल सुफा या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित असून देशभरातील बॉम्बस्फोटाचा संपूर्ण कट उघडकीस आल्याची माहिती दिली आहे. कोथरूड येथे दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या महंमद युनूस महंमद याकूब साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा, मूळ रतलाम, मध्य प्रदेश) यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर ते एनआयए शोध घेत असलेले दहशतवादी असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या दोघांचा ताबा एटीएसने घेतल्यानंतर दोघांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट चाचणी केल्याचे उघडकीस आले.
या दोघांना पुण्यातील कोंढवा भागात राहण्यास खोली देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२ रा, कोंढवा) याला तसेच आर्थिक मदत करणारा रत्नागिरी येथील मेकॅनिकल इंजिनीअर सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७) याला अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरात घातपाताचा कट आखल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कटात झुल्फिकार अली बडोदावाल्याचा सहभाग निष्पन्न झाल्यावर त्याला देखील एटीएसने ताब्यात घेतले. झुल्फिकार अली बडोदावाला याने मोहम्मद खान आणि मोहम्मद साकीला पठाण व काझीच्या माध्यमातून दहशतवादी कारवाईसाठी आर्थिक मदत केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एटीएसने त्याला एनआयच्या गुह्यातून वर्ग करून घेतले आहे.
‘आयसिस’च्या दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना जाळयात ओढण्यात महाराष्ट्रातील गट सक्रिय होता. याप्रकरणी एनआयए’च्या पथकाने बडोदावाला याच्या चार साथीदारांना अटक केली होती. दरम्यान भिवंडी तालुक्यातील पडघा भागातून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (छ्ख) अटक शनिवारी आयसिस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक केली. मुस्लिम कट्टरतावादी संघटनेनेसोबत संबंध असल्याच्या आरोपावरून आकिब अतीक नाचन याला ताब्यात घेण्यात आले आहे. आकिब नाचन याने मध्य प्रदेश मधील रतलाममध्ये बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.